अग्निशमन दलाच्या वार्षिक स्पर्धेत आज प्रात्यक्षिक
प्रसंगी प्राणांची जोखीम पत्करून आग विझवण्यासाठी सरसावणाऱ्या अग्निशमन जवानांच्या मदतीला येत्या वर्षांत यंत्रमानव येणार आहे. काळबादेवी आग तसेच दहशतवाद्यांकडून झालेल्या ताज हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांवरील प्राणाची जोखीम कमी करण्यासाठी या यंत्रमानवाचा उपयोग होऊ शकेल. अग्निशमन दलाच्या सोमवारी होत असलेल्या वार्षिक स्पर्धेत रिमोटवर चालणाऱ्या या यंत्रमानवाकडून आग विझवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.
मुंबईत विविध प्रकारच्या वास्तू आहेत. या सर्व प्रकारच्या वास्तूंमधील आग विझवण्यासाठी गेल्या काही वर्षांत अग्निशमन दल आधुनिक यंत्रांनी सुसज्ज होत आहे. शहरातील टॉवरमधील आग विझवण्यासाठी एकीकडे १५ कोटी रुपयांची ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी अग्निशमन दलात १५ ऑगस्ट रोजी दाखल झालेली असतानाच आता आग विझवणारा यंत्रमानव घेण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. रिमोटच्या साहाय्याने ५०० मीटपर्यंत जाऊ शकत असलेल्या या यंत्रमानवामुळे जोखमीच्या स्थितीत अग्निशमन दलाला मदत होऊ शकेल.
इमारतीचा काही भाग पडण्याची शक्यता, सिलिंडर स्फोटाचा धोका किंवा दहशतवादी कृत्यासारख्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना प्राणांची जोखीम घेऊन पुढे जावे लागते. या अग्निशमन यंत्रमानवामुळे जवानांचा धोका कमी होऊन आग वेगाने विझवण्यास मदत होईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. २०१६-१७ या वर्षांच्या अर्थसंकल्पात या यंत्रमानवाच्या खरेदीसाठी तजवीज करण्यात आली आहे. मात्र सध्या तरी या यंत्रमानवाची किंमत गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

* रणगाडय़ाप्रमाणे दिसणाऱ्या साधारण पाच फूट लांबीच्या वाहनावर पाण्याचा फवारा करू शकणारे यंत्र लावलेले असते. पाण्याच्या टँकरद्वारे या यंत्राला पाणीपुरवठा होईल. रिमोटद्वारे हे यंत्र पुढे नेता येते
* यंत्रमानव जर्मन तंत्राद्वारे बनला आहे. सिंगापूरमध्ये अशा प्रकारचा यंत्रमानव वापरला जातो. ऑस्ट्रेलियात नुकताच या प्रकारच्या यंत्रमानवाचा अग्निशमन सेवेत समावेश
* भारतात पहिल्यांदाच असा यंत्रमानव दाखल होणार आहे