News Flash

अनधिकृत बांधकामांचे मालाड मालवणी!

पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी येथील जिल्हाधिकारी जमिनीवर असलेल्या इमारतींची पडझड झाल्यामुळे मालवणीतील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

परिसरातील बेकायदा इमारतींकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी येथील जिल्हाधिकारी जमिनीवर असलेल्या इमारतींची पडझड झाल्यामुळे मालवणीतील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या विभागात गेल्या कित्येक वर्षांत फोफावत गेलेल्या अनधिकृत बांधकामांकडे सर्व यंत्रणा काणाडोळा करीत आहेत. मात्र बुधवारी झालेल्या दुर्घटनेमुळे आता सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना होतात आणि धोकादायक इमारतींची चर्चा सुरू होते. मग म्हाडा, पालिका, पोलीस, राजकारणी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. दोन वर्षांपूर्वी केसरबाई इमारत पडल्यानंतर म्हाडा आणि पालिका यांच्यात जबाबदारी झटकण्यावरून स्पर्धा लागली होती. मालाडमधील या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिका यांच्यातील हद्दीचा वाद पुढे आला आहे. मालवणीमध्ये गेल्या काही वर्षांत तीन ते चारमजली झोपडय़ा उभ्या राहू लागल्या आहेत. या बहुमजली झोपडय़ा अनधिकृत आहेत हे उघड सत्य आहे. मात्र त्यावर ना पालिका कारवाई करते, ना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारवाई के ली जाते.

पुनर्विकास योजनेची गरज

मालवणी विभागाची ही रचना खूप जुनी असून १९८६ पासून या ठिकाणी झोपडय़ा आहेत. प्रकल्पबाधितांना या जमिनीवर जागा देण्यात आल्या होत्या. पिचेस म्हणजेच आरेखन करून या जागा देण्यात आल्या होत्या. या जागांवर या झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्याचे भाडेपावतीचे पुरावे आहेत. मात्र झोपडय़ांवर गेल्या काही वर्षांत अनधिकृत मजले उभे राहिले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी जमिनीवर या झोपडय़ा असल्यामुळे अनधिकृत मजले हटवण्याचे अधिकार पालिकेला नाहीत.

केवळ पदनिर्देशित अधिकारी त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणू शकतात, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मालवणीतील अनधिकृत बांधकामे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फोफावली आहेत की त्यावर एके क कारवाई करणे अवघड असून या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून धारावीप्रमाणे एखादी पुनर्विकास योजना आणणे आवश्यक असल्याचे मतही अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले आहे.

अनधिकृत बांधकामांना हितसंबंधांचे संरक्षण

मालाडमधील अनधिकृत बांधकामांमागे पालिका, जिल्हाधिकारी या दोन प्राधिकरणांचे अधिकारी, पोलीस, राजकारणी यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याचा आरोप भाजपचे मालाडमधील नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. मालवणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असल्याबद्दल वारंवार संबंधित प्राधिकरणांना पत्र लिहून कळवले असल्याचा दावा मिश्रा यांनी के ला आहे. ही दुर्घटना के वळ पावसामुळे घडलेली नाही तर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे घडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘मित्राकडे थांबल्याने दुर्घटनेतून वाचलो..’

जुनेद अहमद याचा लसूणविक्रीचा व्यवसाय आहे. त्याच दुकानात तो राहतो. बोरिवलीतील हॉटेलला लसूण पोहोचवून मालवणीत परतत होतो. दुकानात येण्यापूर्वी मित्राला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेलो. काही वेळ तिथेच गप्पा मारत थांबलो. मी घरात नसताना दुर्घटना घडली. नाहीतर आज इथे बोलायला जिवंत असतो की नाही याची माहिती नाही. घटनेत दुकानातील सुमारे २५ हजार रुपयांचे लसूण आणि इतर साहित्य, तसेच काही पैसे गेले, असे जुनेद याने सांगितले.

भिक्षा मागून खाणाऱ्या महिलेचा संसार उद्ध्वस्त

पती जिवंत नाही. मुलाच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षा मागून गुजराण करते. दुर्घटनेत घराची भिंत इमारत शेजारच्या घरावर पडल्याने आमची जोडून असलेली भिंतही कोसळली. मी तिथेच उभी असल्याने काही कळण्यापूर्वीच ढिगाऱ्यात सापडले होते. मात्र स्थानिकांनी लागलीच मला बाहेर काढले. आता माझेही संपूर्ण घर पडले आहे. आधीच खाण्यापिण्याची भ्रांत असताना डोक्यावरचे छतही गेले. आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे, असे रुबिना शेख यांनी सांगितले.

मालवणीतील न्यू कलेक्टर कंपाउंड भागात तीन मजली इमारत कोसळली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:41 am

Web Title: malad malvani unauthorized constructions ssh 93
Next Stories
1 चुनाभट्टी स्थानकातील पाणी ओसरण्यास १५ तास
2 मुंबईत ४८५ अतिधोकादायक इमारती
3 कांदे महागले
Just Now!
X