‘रचनावादी शिक्षण’ ही संज्ञाही फारशी परिचित नसताना दादरच्या ‘बालमोहन विद्या मंदिर’ शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गामध्ये ही संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या मालन रेगे (वय ८३) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शिक्षणतज्ज्ञ बापूसाहेब रेगे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा गिरीश आणि गुरुप्रसाद, मुलगी शुभदा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांनी बालमोहनच्या रूपाने शिक्षण क्षेत्रात संवर्धित केलेल्या वृक्षाची बापूसाहेब अर्थात मोरेश्वर रेगे यांनी तितक्याच तळमळीने जोपासना केली. अभ्यासाबरोबरच आपल्या सणांच्या विविध परंपरा जपण्यात आणि वाढविण्यात त्यांचा सहभाग होता. विविध उपक्रम राबवून शाळेची वेगळी ओळख ठसविण्यात मालन वहिनींचा हात होता. त्यांची पदवी गं्रथालयशास्त्र या विषयातील होती. त्यामुळे, शाळेचे ग्रंथालय सुसज्ज करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ‘ऊर्मी बालविकास केंद्रा’च्या माध्यमातून पूर्व प्राथमिक वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता अनेक उपक्रम त्यांनी राबविले. रचनावादी शिक्षणाचा बोलबाला आता सर्वत्र होत आहे. पण, याचे धडे शाळेच्या माध्यमातून देण्यास त्यांनी फार पूर्वीच सुरुवात केली होती.