कारावास झालेले, समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांवरही निर्बंध

हिवताप (मलेरिया) झालेल्या व्यक्तीला आता किमान तीन वर्षे रक्तदान करता येणार नाही. कारावासाची शिक्षा भोगलेल्या व्यक्तीलाही सुटकेनंतर वर्षभर तरी रक्तदान करण्याची मुभा असणार नाही.  डेंग्यू तसेच गोवर, कांजण्या आदी संसर्गजन्य आजार झाल्यानंतरही सहा महिने रक्तदान करता येणार नाही. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी किंवा समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना रक्तदान करण्यास मज्जाव आहे.

रक्तामधून रुग्णाला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रक्तदानाच्या अटींमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या नव्या नियमावलीनुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने हे बदल केले आहेत.

दात्याकडून घेतले जाणारे रक्त सुरक्षित असावे, यासाठीची नियमावली औषधे व सौदर्य प्रसाधने १९४५ अधिनियमामध्ये नमूद केली आहे. परंतु, काळानुसार आजार आणि त्यांचे स्वरूप लक्षात घेता राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ऑक्टोबर २०१७ मध्ये यात बदल केले आहेत. मलेरिया झालेल्या व्यक्तीला बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर रक्तदान करता येत असे. परंतु, नव्या नियमावलीनुसार मागील तीन वर्षांत मलेरिया झाला असल्यास किंवा त्यावरील औषधे घेतल्यास रक्तदान करण्यास मज्जाव असणार आहे. मागील वर्षभरात कारावासाची शिक्षा भोगली असल्यास रक्तदान करता येणार नाही, असे ही या नियमावलीत नमूद केले आहे.

रक्तदान करण्यापूर्वी दात्याकडून अर्ज भरून घेतला जातो. या अर्जाचा आराखडा बदलून यात या नव्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. राज्यभरात हे नियम लागू केले आहेत. रुग्णाला सुरक्षित रक्त दिले जावे, यासाठी हे बदल करण्यात आल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.

कारावासातील व्यक्ती नशा करण्याची किंवा समलिंगी संबंध ठेवणे आदी बाबींची शक्यता असते. कारावास भोगून आलेल्या व्यक्तीचे रक्त घेऊ नये, असे औषधे व सौर्दय प्रसाधने १९४५ अधिनियमामध्ये नमूद केले आहे. अर्जावर मात्र आता हे नव्याने नमूद केले आहे. यांमुळे रुग्णाला रक्ताच्या माध्यमातून होणारे संभाव्य धोके नक्कीच कमी होतील, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले.

हिवताप झाल्यानंतर औषधोपचार केल्यानंतरही त्याचे विषाणू यकृतामध्ये राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आजार बरा झाला किंवा ताप अन्य लक्षणे दिसत नसली तरी या विषाणूंची लागण रक्ताच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो. यासाठीच रक्तदानास मनाईचा कालावधी तीन वर्षे केला आहे. -डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, राज्य पॅथोलॉजीस्ट संघटना