‘गेट वे लिटफेस्ट’मध्ये चित्रकर्ते अदूर गोपालकृष्णन यांचे मत

मुंबई : ‘मतभिन्नता हा सर्जनशीलतेचा आत्मा आहे आणि मतभिन्नतेतून उद्भवणारी चर्चा, वाद, मतप्रदर्शन हाच लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रसिद्धीमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे हे धोकादायक ठरेल’, असे मत मल्याळी चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. एनसीपीए येथे आयोजित ‘गेट वे लिटफेस्ट’मध्ये ‘द रायटर्स ब्लॉक : स्टडीड सायलेन्स ऑर द फिअर ऑफ अननोन’ या विषयावर गोपालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात राजकीय विश्लेषक बालाशंकर, ज्येष्ठ पत्रकार शशी कुमार आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर सहभागी झाले होते.

‘गेटवे लिटफेस्ट २०२०’ या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. ‘भारतीय साहित्य २०२५’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गेटवे लिटफेस्टच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अदूर गोपालकृष्णन यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक केले. सीतांशू यशसचंद्र यांनी या संमेलनाच्या विषयामागील पार्श्वभूमी मांडली. प्रसिद्ध लेखिका ऊर्मिला पवार यांना प्रसिद्ध लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यानंतर पहिल्या सत्रात ‘द रायटर्स ब्लॉक : स्टडीड सायलेन्स ऑर द फिअर ऑफ द अननोन?’ या विषयावर शशी कुमार म्हणाले, ‘अनेकदा सत्याची जागा शांतता घेते. परंतु अशी शांतता फसवी असते. अशा परिस्थितीत बोलण्यावरील निर्बंध झुगारून जो व्यक्त होतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते. घटनेने दिलेल्या विचार स्वातंत्र्यात प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्याचाही अंतर्भाव आहे. आजची तरुण पिढी मुद्रित माध्यमांना बाजूला करून समाज माध्यमाच्या विश्वात जगत आहे. मात्र, जोपर्यंत एखादी गोष्ट वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर येत नाही तोपर्यंत ती सत्य मानली जात नाही. परंतु, आपण सर्व जाणीवपूर्वक उभ्या केलेल्या वास्तवाचे बळी आहोत. त्यामुळे पत्रकारितेची नव्याने व्याख्या करणे गरजेचे आहे.’

‘प्रस्थापित व्यवस्थेत लोकांना बदल नको असतो. उलट त्यांना त्यात सहभागी होणे आवडते. आपल्या परंपरेचा आकृतीबंध ठरला आहे. यात प्रश्न विचारण्याला स्थान नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य आपण विसरत आहोत. त्यामुळे प्रश्न विचारण्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे,’ असे गिरीश कुबेर म्हणाले.

‘२०१४ साली जे झाले ते अनपेक्षित आणि क्रांतीकारी ठरले. नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म यांच्या आधारावर राजकारण न करता ‘भारत, सब का साथ सब का विकास’ या आधारावर राजकारण केले. त्यांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या आधीची सहा दशके राजकारणाचे स्वरूप वेगळे होते. प्रश्न विचारले जात होते. सर्जनशीलता भीतीच्या छायेखाली टिकू शकत नाही. सध्याच्या राजकीय घटनांचे विश्लेषण करणारी पत्रकारिता अलीकडच्या काळात दिसत नाही,’ अशी खंत बालाशंकर यांनी व्यक्त केली.

‘गेट वे लिटफेस्ट’मध्ये ‘द रायटर्स ब्लॉक : स्टडीड सायलेन्स ऑर द फिअर ऑफ अननोन’ या विषयावर  (डावीकडून) राजकीय विश्लेषक बालाशंकर, चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन, पत्रकार शशी कुमार आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शुक्रवारी विचार मांडले.