चॅटिंग करीत तरुणाला फसवले
ऑनलाइन भेटलेल्या ‘तरुणी’शी केलेले चॅटिंग आणि अश्लील चाळे सायन येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाला भलतेच महागात पडले. तो जिच्याशी मुलगी समजून चॅटिंग करीत होता ती मुलगी नव्हती, तर मुलगा होता. या डमी मुलीने त्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागायला सुरुवात केली. अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या आधारे मुलाऐवजी मुलीची उत्तेजक दृष्ये दाखवून ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सायबर गुन्ह्यांच्या एका नवीनच वाटेचा शोध या प्रकरणामुळे पोलिसांना लागला आहे.
सायन येथे राहणारा जिग्नेश व्होरा (नाव बदलेले) या तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. इतर तरुणांप्रमाणे तोही विविध सोशल साइट्सवर चॅटिंग करत होता. ‘याहू चॅट’वर त्याची ओळख अवंतिका या मुलीशी झाली.  अवंतिकाने चॅटिंग करता करता त्याला जाळ्यात ओढले. वेबकॅमच्या माध्यमातून अश्लील चाळेही केले. मात्र, ‘अवंतिका’ बनलेल्या निखिल लाला (२४) याने आपले खरे रूप उघड करत जिग्नेशला ‘ब्लॅकमेल’ करण्यास सुरुवात केली. वेबकॅममधील अश्लील चाळ्यांची माहिती पत्नीला देण्याची धमकीही त्याने दिली. यातून सुटायचे असल्यास ८० हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणीही निखिलने केली. या प्रकाराने घाबरलेल्या जिग्नेशने  शीव पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दूरध्वनी तपशील तपासले. तो दूरध्वनी अहमदाबाद येथील कांती चौहान नावाच्या तरुणाचा असल्याचे समजले.  कांतीच्या सिमकार्डवरून निखिल धमकी देत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर निखिलला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
स्प्लीटकॅमची कमाल
स्प्लीटकॅम हे एक चॅटिंगचे सॉफ्टवेअर आहे. ते डाऊनलोड केल्यास कुठल्याही मुलीचा चेहरा लावून चॅटिंग करता येते. निखिलही त्याचाच वापर करून जिग्नेशला गंडवत होता. या सॉफ्टवेअरमुळे जिग्नेशला चॅटिंग करताना समोर मुलगी दिसत होती. तिचे मोहक रूप पाहून जिग्नेश निखिलच्या सापळ्यात सापडला.