मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह आणि साथीदारांना क्लीनचिट दिल्याच्या विरोधात बळी गेलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबीयांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. २९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथील भिकू चौकात दुचाकीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६ मृत्युमुखी तर १०१ जखमी झाले होते. पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासाअंती ही दुचाकी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावे नोंद असल्याचे निदर्शनास आले असतानाही काही दिवसांपूर्वी एनआयएने दुचाकी साध्वी प्रज्ञासिंहची नव्हती असे सांगून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यामुळे सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. यासाठी मंगळवारी आझाद मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जन आंदोलनात मालेगावहून सुमारे शंभर नागरिक सहभागी झाले होते. साध्वीची मुक्तता करून आमचा न्याय नाकारला जात असल्याची भावना जमलेल्या मंडळीनी व्यक्त केली. व जेलभरो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

या जनआंदोलनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय निरुपम आणि मालेगावचे आमदार आसिफ शेख रशीद यांनी पाठिंबा दिला. उपस्थित मंत्र्यांनी भाजप सरकारवर साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीनचिट प्रकरणी तोफ डागली.