उच्च न्यायालयाचे विशेष न्यायालयाला आदेश

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट (२००८) खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जलदगतीने आणि कुठल्याही विलंबाविना घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला सोमवारी दिले.

विशेष म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले जाणार आहेत. या प्रकरणातील एक आरोपी समीर कुलकर्णी याने केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी २६ ऑक्टोबरला या प्रकरणातील आरोपींवर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले जाणार आहेत. मात्र त्या वेळी आपल्याकडून सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली जाणार नाही, अशी ग्वाही ‘एनआयए’च्या वतीने अ‍ॅड्. संदेश पाटील यांनी न्यायालयाला दिली.

खटल्याची सुनावणी जलदगतीने तसेच दररोज घेण्यात यावी, असे आदेश विशेष न्यायालयाला देण्याची मागणी कुलकर्णी याने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने कुलकर्णी याची दररोज सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावली. मात्र त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीबाबत दिलेल्या आदेशाचा दाखला देत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विशेष ‘एनआयए’ न्यायालयाला दिले. सर्वोच्च न्यायालयाने खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि कुठल्याही विलंबाविना घेण्याचे आदेश विशेष ‘एनआयए’ न्यायालयाला दिले होते.