तूरडाळीचा एक लाख ३६ हजार टन साठा जप्त केल्याची शेखी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट सध्या मिरवत आहेत तर जप्त केलेली १३ हजार टन डाळ विक्रीसाठी खुली केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक लाख २३ हजार टन डाळ गेली कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचा अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे डाळीचे भाव २६० रुपये झाले असून केंद्र शासनाने वेगवेगळ्या राज्यातील जप्त केलेल्या डाळीची माहिती मागितली असता महाराष्ट्राने ती का लपवली असा सवालही नबाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. डाळीच्या साठय़ावरील नियंत्रण काढू नका अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. तरीही सरकारने व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी १५ एप्रिल २०१५ रोजी डाळीच्या नियंत्रित साठय़ावरील बंधन उठवले. परिणामी साठ रुपये किलो दराने मिळणारी डाळ नव्वद रुपये किलो व पुढे २६० रुपये किलो प्रमाणे व्यापाऱ्यांनी विकण्यास सुरुवात केली असा आरोप केला.