अग्निप्रतिबंधक यंत्रणेतील त्रुटींप्रकरणी अग्निशमन दलाची नोटीस; अनधिकृत बांधकामांवरही कारवाईची तयारी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील २९ मॉलमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याचे अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीत उघडकीस आले असून या सर्व मॉल्सच्या व्यवस्थापनावर नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर मॉलमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी संबंधित विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

‘बेस्ट’च्या मुंबई सेंट्रल आगारासमोरील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल ५६ तास लागले होते. दिवाळी जवळ आल्यामुळे दुकानदारांनी विक्रीसाठी साठविलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दुकानात मोठय़ा प्रमाणावर ठेवलेले सॅनिटायझर आदी विविध कारणांमुळे या मॉलला लागलेली आग सतत अक्राळविक्राळ रूप घेत होती. परिणामी, आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला अनेक अडथळे आले.

सिटी सेंटर मॉलमधील अग्नितांडवाची घटना लक्षात घेऊन अग्निशमन दलाने मुंबईतील सर्वच मॉलची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाने मुंबईतील मॉल्सची पाहणी केली. अग्निप्रतिबंध यंत्रणेत त्रुटी असल्याचे आढळल्यामुळे २९ मॉल्सना अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. यात शहरातील तीन, पूर्व उपनगरांतील चार तर पश्चिम उपनगरांतील २२ मॉल्सचा समावेश आहे.  कांदिवलीतील पाच, तर बोरिवलीतील चार, मालाड आणि सांताक्रुझमधील प्रत्येकी तीन, तर दहिसरमधील दोन मॉल्सचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, काही मॉल्समध्ये अनधिकृत बांधकाम, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार अग्निशमन दलास नाहीत. त्यामुळे या प्रकरणी संबंधित विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्याच आठवडय़ात अग्निशमन दलाने वरळीच्या अट्रीया मॉल्समध्ये बेकायदा बांधकाम असल्याचा आरोप केल्यानंतर या मॉलची तपासणी करून नोटीस देण्यात आली होती.

नोटीस मिळालेले मॉल

  • शहर विभाग – सीआर टू मॉल नरीमन पॉइंट, सिटी सेंटर मॉल नागपाडा, नक्षत्र मॉल, दादर
  • पश्चिम उपनगर – सुबरीबीआ मॉल वांद्रे, ग्लोबस प्रायव्हेट लिमिटेड वांद्रे, रिलायन्स ट्रेंड मेन स्ट्रीट मॉल वांद्रे, हाय लाइफ प्रिमायसेस वांद्रे, केनिल वर्थ शॉपिंग सेंटर खार, मिलन मॉल गार्मेट हब, सांताक्रुझ, रिलायन्स रिटेल लिमिटेड डिजिटल सांताक्रुझ, दि झोन मॉल बोरिवली, रिलायन्स मॉल शिंपोली बोरिवली, गोकुळ शॉपिंग सेंटर बोरिवली, देवराज मॉल बिल्िंडग दहिसर, साईकृपा मॉल दहिसर, सेंट्रल प्लाझा, इस्टर्न प्लाझा मालाड, दि मॉल मालाड, नेक्स मॉल कम थिएटर कांदिवली, विष्णू शिवम मॉल कांदिवली, ठाकूर मूव्ही एन्ड शॉपिंग मॉल कांदिवली, ग्रोवेल मॉल कांदिवली.
  • पुर्व उपनगर – के स्टार मॉल चेंबूर, क्युबिक मॉल चेंबूर, हायको मॉल पवई, ड्रीम मॉल भांडुप.

७१ मॉलची तपासणी

मुंबई अग्निशमन दलाने मागील दहा दिवसांपासून शहरातील ७१ मॉल्सची तपासणी केली आहे. त्यापैकी सिटी सेंटरसह २९ मॉल्समधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत. या सर्व मॉल्सना नोटीस पाठविण्यात आल्या असून महिन्याभरात त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात त्रुटी दूर न झाल्यास अग्निशमन दलामार्फत न्यायालयीन कारवाईही केली जाऊ शकते. तसेच वेळ पडल्यास या मॉल्सचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो.