जागोजागी वाट अडवून बसलेले बेकायदा फेरीवाले, अरुंद पादचारी पूल आणि वाहनतळांच्या मर्यादित संख्येमुळे प्रवाशांसाठी समस्यांचे आगार ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची मान्यता मिळाल्यास या स्थानकाला वाशी, बेलापूर स्थानकांप्रमाणे व्यावसायिक संकुलांचे कोंदण लाभू शकणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप, नाहूर आणि ठाणे या तीन स्थानकांवर व्यावसायिक संकुले उभारण्यासाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करण्याचा प्रस्ताव रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मुंबई आणि ठाणे महापालिकेपुढे ठेवला आहे. मात्र वाढीव चटईक्षेत्राचे अधिकार बहाल करण्याऐवजी व्यावसायिक संकुल उभारणीचे हक्क विकत घेण्याची तयारी ठाणे महापालिकेने दाखविली आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात २८ कोटी रुपये रोख, तर दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रीमियम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला भरण्याचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या लक्षात घेता स्थानकाच्या डोक्यावर व्यावसायिक संकुलाची उभारणी कितपत फायदेशीर ठरेल, याचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारायचे, मात्र त्याचा वापर नागरी सुविधा केंद्र, वाहनतळ, फुड कोर्टच्या निर्मितीसाठी करता येऊ शकतो, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी लोकसत्ताला दिली.
महापालिकेला हवी जागा
मध्य रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने यासंबंधीचा मूळ प्रस्ताव तयार केला आहे. नवी मुंबईत रेल्वे स्थानकांची उभारणी करताना सिडकोने व्यावसायिक संकुलांची कल्पना पहिल्यांदा अमलात आणली. वाशी आणि बेलापूर या दोन स्थानकांवरील जागेवर (एअर स्पेस) माहिती तंत्रज्ञान उद्योगावर आधारित संकुलांची उभारणी करण्यात आली, तर सी-वूड दारावे रेल्वे स्थानक संकुलाचा विकास एलएण्डटीसारख्या नामांकित कंपनीमार्फत केला जात आहे. रेल्वे स्थानक  संकुलांचा नेमका हाच पॅटर्न मध्य रेल्वे मार्गावरील नाहूर, भांडुप आणि ठाणे रेल्वे स्थानकात राबविण्याचा रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे.
वाढीव चटईक्षेत्राची गरज
हा विकास किफायतशीर ठरावा यासाठी रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मुंबई, ठाणे महापालिकेकडे तीन चटईक्षेत्र निर्देशांकाची मागणी केली आहे. एवढय़ा प्रमाणात एफएसआय मिळाला तरच व्यावसायिक संकुलांचा आराखडा प्रत्यक्षात उतरू शकतो, असे महामंडळाचे मत आहे. दरम्यान, महामंडळाला वाढीव एफएसआय बहाल करण्याऐवजी ठाणे स्थानकावरील विकासाचे हक्क विकत घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने आखला असून त्यासाठी २७ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. हे हक्क विकत घेण्यापूर्वी यासंबंधीच्या प्रस्तावाचे क्रिसिल कंपनीकडून विश्लेषण करून घेतले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.