‘राफेल’वरून खरगे यांचा भाजप सरकारला सवाल

काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सत्तेत असताना चौकशीसाठी संसदेची संयुक्त समिती स्थापन केली होती. आम्ही चौकशीला घाबरलो नव्हतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन संसदीय चौकशी समिती नेमण्यास घाबरत आहेत. यावरून काही तरी गडबड असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

राफेल विमान खरेदीवरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य करताना या विरोधात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. खरगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, संजय निरुपम, कृपाशंकर सिंग आदी सहभागी झाले होते. राफेल विमानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.  मोर्चाच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात आल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला.

राफेल विमान खरेदीचा सारा व्यवहार हा पारदर्शक असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. मग विमानाची किंमत का जाहीर केली जात नाही, असा सवाल खरगे यांनी केला. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला राफेल व्यवहारात सहभागी करून घेण्यासाठी भारत सरकारने दबाव आणल्याचा गौप्यस्फोट फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी केला आहे. यावरून मोदी यांचे हितसंबंध स्पष्ट होतात, असेही खरगे यांनी सांगितले. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातूनच चले जावचा नारा देण्यात आला होता. आता याच मैदानातून आम्ही भाजप सरकारच्या चले जावचा नारा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. साराच व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.