मुंबईहून कोल्हापूरसाठी वेगळी गाडी नक्कीच सोडली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी रेल्वेचे बडे अधिकारी, सर्वपक्षीय खासदार आणि काही आमदार यांच्या उपस्थितीत केली आणि कोकणातील चाकरमान्यांबाबत रेल्वे प्रशासन नेहमीच दुजाभाव दाखवत आल्याची रड गुरुवारीही कायम ठरली. पश्चिम महाराष्ट्रातील विविध आमदार व वनमंत्री पतंगराव कदम यांनी या गाडीसाठी विशेष मागणी केली होती. कोकणातील चाकरमान्यांची संख्या मुंबईत जास्त असूनही त्यांच्यासाठी विशेष गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी कोकणातील एकाही लोकप्रतिनिधीने लावून न धरल्याने अखेर कोकणवासीयांच्या नशिबी उपेक्षाच आली.
मुंबईचे पालकमंत्री मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी आपल्या भाषणादरम्यान रेल्वेमंत्र्यांसमोर विविध मागण्यांची यादीच सादर केली. पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत स्थायिक झालेल्यांचे प्रमाण खूप आहे. मात्र मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाडय़ांची संख्या खूपच कमी आहेत. मुंबईहून कोल्हापूरला ‘महालक्ष्मी’, ‘कोयना’ आणि ‘सह्याद्री’ या तीन गाडय़ा जातात. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी एक आणखी गाडी सुरू करावी, अशी मागणी खान यांनी केली. त्याचबरोबर सांगलीजवळील किर्लोस्कर वाडी या स्थानकावरही गाडय़ांना थांबा द्यावा, असे ते म्हणाले.
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या भाषणात खान यांच्या मागण्यांचा संदर्भ घेत कोल्हापूरसाठी मुंबईहून एक गाडी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कोल्हापूरहून बेंगळुरू येथे जाणारी एक गाडीही सुरू करण्यात येईल, असे सांगितले. किर्लोस्कर वाडी येथील थांब्याबद्दलही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे एप्रिल-मे या दरम्यान कोल्हापूरवासीयांसाठी या नव्या गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या गाडीसाठी वनमंत्री पतंगराव कदम यांनीही आपल्याकडे पाठपुरावा केला होता, असे रेल्वेमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कोकणातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांची संख्याही तुल्यबळ असल्याचा विसर मुंबईच्या पालकमंत्र्यांना पडला. तसेच कोकणातील लोकप्रतिनिधी एकमेकांवरच दुगाण्या झाडण्यात मश्गुल असल्याने त्यांना कोकणवासीयांच्या हितासाठी अशी कोणतीही मागणी करता आली नाही का, असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. कोकणातील नारायण राणे आणि भास्कर जाधव हे दोन्ही आमदार आपापल्या पक्षांत वजनदार आहेत. तरीही खास कोकणसाठी अशा कोकण रेल्वेच्या खूपच कमी गाडय़ा आहेत. या सर्व गाडय़ा गोवा किंवा दक्षिणेतील राज्यांसाठीच आहेत. पण कोकणच्या लोकप्रतिनिधींनी कोकणातील चाकरमान्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे एकाही गाडीसाठी आग्रह धरलेला नाही.