सुमारे साडे चार महिन्यांच्या कालावधीनंतर मॉल्स आणि व्यापारी संकुले बुधवारपासून सुरू होत आहेत. याशिवाय मुंबईत सातही दिवस आणि दुतर्फा दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात सुरुवातीच्या काळात  करोनाचे रुग्ण सापडल्यावर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात मॉल्स व व्यापारी संकुले बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. तेव्हापासून हे सारे बंद होते. जून महिन्यापासून ‘पुनश्च हरिओम अभियान’ राबविताना दुकाने व खासगी कार्यालये सुरू करण्यात आली होती. परंतु मॉल्स बंदच ठेवण्यात आले होते. केंद्राने जुलै महिन्यापासून मॉल्स खुले करण्यास परवानगी दिली होती, पण राज्याने ही परवानगी नाकारली होती. बुधवारपासून राज्यातील मॉल्स व व्यापारी संकु ले सुरू होतील. त्यातील उपहारगृहे, चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत. फक्त दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

खुल्या जागेत टेनीस, जिम्नॅस्टिक, नेमबाजी, गोल्फ, बॅडिंमंटन खेळण्यास बुधवारपासून परवानगी देण्यात आली आहे. फक्त वैयक्तिक पातळीवर हे खेळ खेळता येतील. सांघिक खेळांना परवानगी देण्यात आलेली नाही.

मुंबई महापालिकेने बुधवारपासून दुतर्फा दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार आठवडय़ातील सर्व दिवस दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवता येतील.