कुटुंबाचे छत्र नसल्यामुळे अनाथालयात राहणाऱ्या तरुण वयाच्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठे असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.
बहुतांश अनाथालयांमधील मुलांकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यांची मानसिक कुचंबणा हे सामाजिकदृष्टय़ा चिंतेचे विषय राहिलेले आहेत. त्यातच त्यांची खाण्यापिण्याची आबाळ झाली तर शारीरिक वाढीवरही कायमस्वरूपी गंभीर परिणाम होतात. अनाथालयातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ४४ टक्के असल्याचे ‘कॅटॅलिस्ट्स फॉर सोशल अ‍ॅक्शन’ (सीएसए) या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा आमि ओडिसा या राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
अनाथालयांमधील ४४ टक्के मुले कुपोषित आहेत, तसेच १४०० पैकी एक हजाराहून अधिक मुलांना आणखी उपचारांची गरज आहे. आरोग्यदायक परिस्थितीचा आणि पोषक आहाराचा अभाव हे मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांना जबाबदार असलेले प्रमुख घटक असल्याचा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
याखेरीज,एक टक्का मुले लठ्ठ असून सहा टक्के मुलांचे वजन गरजेपेक्षा जास्त आहे असे सर्वेक्षकांचे म्हणणे आहे. लोकप्रिय किंवा नेत्यासारखी वागणारी काही अनाथालयांमधील ठराविक मुले इतर मुलांच्या वाटय़ाचे अन्न बळकावतात अशीही शंका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. काही मुलांचे वजन अधिक असण्याचे कारण अनुवांशिकता हे असले, तरी मुंबईसारख्या शहरांमध्ये खेळण्यासाठी मैदानांचा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे कारण असल्याचे दिसून आले.
मुलांमधील कुपोषण हे केवळ अन्न खाण्यावर अवलंबून नाही, तर आरोग्याच्या सेवा न मिळणे, मुलांच्या व गर्भवती मातांच्या संगोपनाचा दर्जा आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी यांचा त्यावर मोठा प्रभाव पडतो. कमी अन्न खाण्यासोबतच कमी कॅलरीज असलेले अन्न घेणे आणि दूध व भाज्यांपासून वंचित राहणे हे कुपोषणाचे कारण असून, अनाथालयांमध्ये मुलांच्या आरोग्याची  तपासणी केली जात नाही, असे सीएसएचे सर्वेक्षक सिडने यांनी सांगितले.
सीएसए ही मुलांच्या कल्याणासाठी व पुनर्वसनासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था असून चार राज्यातील ४८ अनाथालये आणि दत्तक संस्था यांच्यासोबत त्यांचे काम चालते. अनाथालयांमधील मुलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे ती वारंवार आजारी पडतात, असे आढळल्याने संस्थेने स्थानिक डॉक्टर्स आणि अनाथालयांचे व्यवस्थापक यांच्या मदतीने वरील सर्वेक्षण केले.