तज्ज्ञ डॉक्टरांसह उपचार व प्रशिक्षण योजनेस सुरुवात

कुपोषण व बालमृत्यूप्रकरणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाच्या कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने कोरडे ओढले आहेत. कुपोषणावरून आरोग्य खात्याच्या कारभाराचे वाभाडे निघत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी पालघर येथील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बालरोग, स्त्रीरोगतज्ज्ञांची तसेच खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन त्यांनी आज पालघर येथे जाऊन उपचार व प्रशिक्षण योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्यासमवेत जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर, माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, डॉ. खामगावकर यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टर तसेच युनिसेफ, वनवासी कल्याण आश्रम केंद्र, जनकल्याण समिती आणि आरोग्य भारती आदी संस्थांच्या सहकार्याने कुमारिका, गरोदर महिला, लहान मुले यांची स्वतंत्र तपासणी करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कुपोषणग्रस्त भागात जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. एम्पथी फाउंडेशन व पॅथॉलॉजी असोसिएशनच्या माध्यमातून औषध पुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली असून पालघरमधील एका संस्थेत कुपोषण प्रशिक्षण शाळेचेही आज आयोजन करण्यात आले. एकीकडे आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली दहा वर्षे अस्थायी काम करणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नसताना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी याही कामी पुढाकार घेतला असून राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवेत अस्थायी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडली आहे. गेली दोन वर्षे कुपोषणग्रस्त भागात काम करणारे हे डॉक्टर वेळोवेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना सेवेत कायम करण्याची तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करणारे डॉक्टर तसेच रुग्णांना योग्य सुविधा देण्याची मागणी करत आहेत.

आंगणवाडी सेविकांपासून आशा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वानी एकदिलाने काम केल्यास कुपोषणावर मात करता येईल.  –  गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री