मालवणी विषारी दारू प्रकरणातील एका फरारी आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील बडोदा येथे अटक केली आहे. सुभाष गिरी असे या फरारी आरोपीचे नाव असून गिरीच्या अटकेनंतर फरारी आरोपींची एकूण संख्या आता १३ झाली आहे.
मालवणी येथील एका झोपडपट्टीतील दारूच्या गुत्त्यावर लोकांनी गावठी दारू प्यायल्यानंतर त्यांना विषबाधा झाली होती. यात १०४ जण मरण पावले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी १२ जणांना अटक केली होती. बडोदा येथे राहणारा गिरी हा गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिथेनॉल या रसायनाचा मुख्य पुरवठादार होता. मालवणीतील विषारी दारू प्रकरणानंतर गिरी हा फरारी झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. अन्य आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांनाही ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच गिरी याला येत्या ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.