रेल्वे गाडीत असलेला फिडबॅक अर्ज भरणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. या अर्जावरून एका महिला प्रवाशाचा मोबाइल क्रमांक मिळवून नंतर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये सेवा कशी वाटली त्याबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी फिडबॅक अर्ज असतो. कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने साफसफाई कशी वाटली त्या बद्दलचे आपले मत या फिडबॅकमध्ये भरून आपले नाव आणि मोबाइल क्रमांक दिला होता. या क्रमांकावर तिला सय्यद मोहम्मद मंसूरी (२८) याने सातत्याने दूरध्वनी करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुझे माझ्याशी अनैतिक संबंध आहे, असे तुझ्या सर्व परिचितांना सांगेन असे सांगून त्याने ५ लाख रुपयांची खंडणी मागितली.  या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर समता नगर पोलिसांनी मंसूरी याला सापळा लावून त्याला अटक केली.