तक्रारदाराला एक कोटींचा गंडा

मुंबई : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवत अनेकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या निश्वीतकुमार शेट्टी(३६) या भामटय़ाला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या. त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध असून निश्वीत याच्या मिरारोड येथील घरातून कोटय़वधी रुपयांचे मूल्य दर्शविणाऱ्या,‘भारतीय बच्चों का बॅंक’ असे लिहिलेल्या खेळण्यातल्या किंवा बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

जेवढे गुंतवाल त्याच्या ५० पटीने पाऊस(पैशांचा) पाडेन असे आमीष दाखवत शेट्टी आणि त्याच्या टोळीने मुंबईतील एका घर-जमीन खरेदी-विक्री दलालाला एक कोटी १२ लाख रुपयांना फसवले होते. तर अन्य एका व्यावसायिकाला या टोळीने दहा कोटींचा गंडा घातल्याचे तपासकर्त्यां पोलिसांना समजले आहे. या व्यावसायिकाने मित्र, कुटुंबातील अनेकांना शेट्टीकडे पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते.

गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे पोलीस निरीक्षक महेश देसाई आणि पथकाला शेट्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव गावडे, आशा कोरके, उपनिरीक्षक वाल्मिक कोरे, अंमलदार अरविंद मोहिते, प्रविण कांबळे आणि पथकाने शेट्टी याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने तक्रारदार व्यक्तीसोबत अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली. त्याच्या कारमधून खेळण्यातील बनावट नोटा, बनावट युएस बॉन्ड, अमेरिकन वकीलातीची बनावट पत्रे, अघोरी कृत्यांसाठी वापर होणारी सामग्री हस्तगत करण्यात आली.

शेट्टी याच्या मीरा रोड येथील निवासस्थानी थर्माकोलच्या भिंतींवर दोन हजार आणि पाचशे रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटांची बंडले रचलेली आढळली. तसेच मोठय़ा प्रमाणावर अघोरी कृत्यासाठीची सामग्रीही आढळली.

पैसे ५० पटीने वाढणार या आमीषाने अनेकांनी शेट्टीला कोट्यवधी रुपये दिले होते. या व्यक्ती जेव्हा पाठपुरावा करत, पैशांचा पाऊस कधी पडणार याबाबत विचारणा करत तेव्हा तो त्यांना निवासस्थानी घेऊन जात असे. बनावट नोटांची बंडले दाखवून अद्याप पूजा पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण होताच तुमच्या घरी पैशांचा पाऊस पडेल, अशी थाप शेट्टी मारत असे. त्यावरूनही शंका न मिटल्यास बनावट अमेरिकन बॉन्ड किंवा अन्य बोगस कागदपत्रे दाखवून शेट्टी आपल्या खात्यात ५० कोटी रुपये येणार असल्याचा आभास निर्माण करे, अशी माहिती पथकाला मिळाली आहे.

नांदोस हत्याकांडानंतरही.?

२००३साली सिंधुदुर्ग जिह्यतील जंगलात(नांदोस, कसाल) सात जणांचे मृतदेह सापडले होते. मृत व्यक्तींत नवीमुंबईतील केरुभाऊ माळी कुटुंबातील एका कुटुंबातील चौघांचा समावेश होता. माळी फळ, भाज्यांचे घाऊक विक्रेते होते. त्यांचे २५ लाखांचे कर्ज होते. ते फेडण्याचा उपाय अघोरी कृत्यांआधारे शोधत होते. अशात त्यांची ओळख पैशांचा पाऊस पाडणाऱ्या आरोपींसोबत झाली. तीन लाख रुपये घेऊन आरोपींनी माळी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना नांदोसच्या जंगलात पुजेच्या निमित्ताने नेले आणि तेथे त्यांची हत्या करण्यात आली. माळी कुटुंबासोबत अन्य तिघांचे मृतदेह तेथे आढळले होते.