लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नवोदित कलाकार असलेल्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या. प्रदीप प्रेमनारायण तिवारी ऊर्फ चिंटू (२७) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे नोंद आहेत.

१४ जानेवारीच्या मध्यरात्री दोन ते पहाटे चार या वेळेत दहिसर परिसरातील एका निर्जन इमारतीत हा गुन्हा घडला होता. तक्रारदार तरुणी वसईहून मुंबईतील घरी रिक्षाने येत होती. दहिसर चेक नाक्यावर उतरून दुसरी रिक्षा पकडून घर गाठण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र बराच वेळ तिला रिक्षा मिळेना. इतक्यात दुचाकीवरून आलेल्या चिंटूने तरुणीला दहिसर रेल्वे स्थानकात सोडतो, असे सांगितले. त्याने रेल्वे स्थानकाऐवजी एका निर्जन इमारतीजवळ दुचाकी थांबवून तरुणीला तेथे ओढत नेले. दोन तास मारहाण केल्यानंतर चिंटूने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर तरुणीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्हे शाखेच्या दहिसर कक्षाने या गुन्हय़ाचा समांतर तपास सुरू केला. तक्रारदार तरुणीकडे चौकशी करताना आरोपी अनोळखी आहे. मात्र त्याने जबरदस्ती आपला मोबाइल नंबर घेतला होता. २ फेब्रुवारीला अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज आणि अरोपीचा आवाज मिळताजुळता होता, ही महत्त्वपूर्ण माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तोच धागा पकडून प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि पथकाने तांत्रिक तपास करून संबंधित मोबाईल मालकाला चौकशीसाठी ताब्यता घेतले. मात्र आरोपी हा नव्हे, अशी प्रतिक्रिया तक्रारदार तरुणीने दिली. पथकाने मोबाईल मालकाकडे कसून चौकशी केल्यानंतर चिंटू नावाच्या मित्राने हा फोन वापरला होता, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर पथकाने सर्व माहिती गोळा करून चिंटूला अटक केली. पोलीस चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. तसेच तक्रारदार तरुणीनेही त्याची ओळख पटवली.