मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून कुडाळ ते विक्रोळी असा प्रवास करणाऱ्या तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अब्दुल समद बननजे कादरसाहेब (२८) या तरूणास ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्याला कुडाळ पोलिसांच्या हवाले करण्यात येणार आहे.
विक्रोळी भागात रहाणारी एक २० वर्षीय तरुणी कुडाळ येथील समाजप्रबोधन कार्यक्रमासाठी गेली होती. १४ आणि १५ डिसेंबरचा कार्यक्रम आटपून ती रविवारी रात्री मत्स्यगंधा एक्स्प्रेसने घरी परतत होती. त्यावेळी काही ओळखीचे लोक तिच्यासोबत होते. दरवाजाजवळ असलेल्या चार्जिग पाईंटद्वारे ती मोबाईल चार्ज करीत होती. तेथे उभा असलेला अब्दुल याने सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात काही तरी पदार्थ टाकला आणि ही सिगारेट ओढण्याची ऑफर त्याने तिला दिली. मात्र, तिने नकार दिल्यानंतर त्याने तिची छेड काढली तसेच तिचा विनयभंग केला. रत्नागिरी स्थानकात उतरून तिने या प्रकाराबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
मात्र, त्याकडे पोलिसांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर तिने डब्यातील नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले आणि पनवेल पोलिसांची मदत घेऊन त्याला ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा कुडाळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.