मुंबई  : चोर असल्याच्या संशयाने केलेल्या मारहाणीत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास वाडीबंदर येथे ही घटना घडली. याप्रकरणी पालिका कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. मंगेश कोंडार (३५) आणि सुरज बोलके (२४) अशी आरोपींची नावे आहेत. तर माजीद अली असे मृत तरुणाचे नाव आहे.

माजीद हा चोरी करण्यासाठी आल्याचा संशय आल्याने मंगेश आणि सुरज यांनी त्याला काठीने मारहाण केली. त्यानंतर माजीदचा मृतदेह कोणालाही संशय येणार नाही, अशारितीने थोडा दुरवर नेऊन ठेवला. रविवारी सकाळच्या सुमारास परिसरातून जाणाऱ्यांनी माजीद याला मृतावस्थेत पाहिले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली. डोंगरी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटिव्हीच्या माध्यमातून चार तासांत आरोपींना अटक केली. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.