महापालिकेच्या लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयाचे माजी उपअधिष्ठाता डॉ. उमेश पै यांचा त्यांच्या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. ते ५८ वर्षांचे होते. मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.  पै हे आपल्या पत्नीसह परळ येथील केईएम रुग्णालयासमोर असलेल्या महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहात होते. शीव रुग्णालयातून उपअधिष्ठाता म्हणून ते वर्षभरापूर्वीच निवृत्त झाले होते. मंगळवारी ते राहात असलेल्या इमारतीच्या खाली रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. रहिवाशांनी त्यांना केईएम रुग्णालयात आणले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  डॉ. पै यांचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली याबाबत तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.