कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या माहीम येथील जोसेफ डिसोझा या ‘लखोबा लोखंडे’ला कोपरखैरणे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या ठगाचे यापूर्वी लग्न झालेले असून घटस्फोट झाला आहे. त्याने अशा प्रकारे अनेक विधवा महिलांना फसवून गैरफायदा घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्याला सीबीडी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी खारघर येथेही एका तरुणाने अशाच प्रकारे सहा महिलांना फसविल्याची घटना उघडकीस आली होती.
कोपरखैरणे सेक्टर-२२ येथे ३९ वर्षीय विधवा महिला आपल्या १४ वर्षीय मुलाबरोबर एकटी राहते. तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर तिच्या नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने शादी डॉट कॉम वेबसाइटवर दुसऱ्या लग्नाची नोंदणी केली. त्यात तिने सर्व महिती खरीखुरी नोंद केली होती. नेटवर अशाच महिलांच्या शोधात असणाऱ्या मुंबई माहीम येथील ग्रीन लॉन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जोसेफ थॉमस डिसोझा या ३९ वर्षीय लखोबा लोखंडे याने संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. जोसेफ याने त्या विधवा महिलेला आपल्या नातेवाईकांबरोबरही ओळख करून दिली. त्यानंतर जोसेफने लग्नाचे आमिष देऊन विधवा महिलेच्या असहायतेचा अनेक वेळा फायदा घेतला. त्या महिलेचा पती म्हणून तिने केलेल्या गर्भपातासाठी डॉक्टरांकडे साक्षीदार म्हणून सहीसुद्धा केलेली
आहे. त्यानंतर त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. या संदर्भात कुठेही तक्रार केल्यास शाळेत जाणाऱ्या मुलाला त्रास देण्याची धमकी जोसेप याची आई हेलन व मैत्रीण आशा डिसोझा यांनी धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जोसेफला अटक केली असून त्याने अशा प्रकारे अनेक विधवा महिलांना फसविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास करण्यासाठी पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पोलीस या लखोबा लोखंडेच्या उपद्व्यापाचा अधिक तपास करीत आहेत.