कांदिवलीतील घटना; तीन आरोपींना अटक

दुकानासमोर टेम्पो उभा करण्यावरून दोन दुकानदारांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्या झाल्याची घटना कांदिवलीच्या लालजीपाडा येथे शनिवारी सकाळी घडली. कांदिवली पोलिसांनी हल्लेखोर तिन्ही भावांना अटक केली आहे.

कांदिवली पश्चिमेकडील गांधी नगर परिसरात अश्फाक आलम शेख आणि सज्जाक अहमद खान यांची भंगाराची दुकाने शेजारी आहेत. भंगार घेऊन येणारे ट्रक, टेम्पो उभे करण्यावरून दोघांमध्येही वाद व्हायचा. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सज्जाक यांच्या दुकानापुढे टेम्पो उभा करत असताना टेम्पो थोडा बाजूला उभा कर, असे अश्फाक याने सांगितले. सज्जाकने त्याकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाला टेम्पो दुकानासमोर उभा करण्यास सांगितला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली. त्या वेळी अश्फाकचे भाऊ इम्तियाझ, सोहेल हे दोघेही धावत आले. त्यांनीही सज्जाकला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुश्ताक अहमद खान (३३) याने दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तीनही भावांनी मुश्ताकवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.