News Flash

लोकलला लटकणाऱ्याचा मृत्यू

इम्रानला तातडीने राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चार वेगवेगळ्या घटनांमध्ये धोकादायक प्रवास करणारे तिघे जखमी

वाऱ्याबरोबर शर्यत लागल्यासारख्या वेगात धावणाऱ्या लोकलच्या दारात उभे राहून साहसी प्रकार करणे चार प्रवाशांच्या चांगलेच जीवावर बेतले. रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत घडलेल्या चार अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. या चार घटनांच्या निमित्ताने दरवाज्यात उभे राहून धोकादायक प्रकार करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास इम्रान शेख हा ३२ वर्षांचा तरुण घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाज्यात उभे राहून साहसी प्रकार करत होता. त्या वेळी हात निसटून तो खाली पडल्याची माहिती प्रवाशांनी दिली. इम्रानला तातडीने राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना मयत म्हणून घोषित केले.

दुसऱ्या घटनेत अमन अली शेख हा १८ वर्षांचा तरुण त्याच्या मित्रांसह लोकलच्या दारात उभा राहून धोकादायक कसरती करत होता. गाडी रात्री ११च्या सुमारास विक्रोळी स्थानकातून सुटल्यावर प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाला लाथ मारण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म संपल्यानंतर रूळांलगत असलेल्या खांबाला त्याची धडक लागली. सीसीटीव्ही चित्रीकरणानुसार अमन एका प्रवाशाकडे पाहून वेडेवाकडे हावभाव करत असताना गाडीने प्लॅटफॉर्म सोडला. रूळांलगतच्या एका खांबाला लागून अमन खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एका घटनेत रात्री १२.१५च्या सुमारास कुर्ला स्थानकाजवळ खांबाला आदळून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची ओळख पटलेली नाही. तर, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास लोकल डब्याच्या छतावरून प्रवास करताना सलीम शेख हा प्रवासी ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला. तो ५० टक्के भाजला असून या दोन्ही प्रवाशांना लोकमान्य टिळक सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 3:37 am

Web Title: man killed in local accident
Next Stories
1 उद्योगांना वीजसवलतीमुळे एक हजार कोटी रुपयांहून अधिक बोजा
2 बेस्ट तुमची, ब्रीदवाक्यही तुमचे!
3 म्हाडातर्फे अर्जदारांना मुदतवाढ
Just Now!
X