आईच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी २१ वर्षीय तरुणाला अटक केली. आपल्या आईचे ३७ वर्षीय रिअल इस्टेट एजंट परवेझ शेख बरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोपी शाहबाज शेखच्या मनात संशय होता अशी माहिती वांद्रे-कुर्ला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री १०.३० च्या सुमारास शाहबाजने त्याची आई आणि परवेझ शेखला निर्जन स्थळी एकत्र पाहिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या शाहबाजने रस्त्यावरचा पेव्हर ब्लॉक उचलून परवेझच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर तासाभरात शाहबाजला अटक करण्यात आली.

आरोपी शाहबाजने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाच वर्षांपूर्वी परवेजची आरोपीच्या आई बरोबर ओळख झाली होती. ती कपडे विक्रीचा व्यवसाय करायची. परवेझ शाहबाजच्या घरी सतत यायचा. त्यामुळे आपल्या आई बरोबर प्रेमसंबंध असल्याचा त्याच्या मनात संशय होता.