दिवा भागात सोमवारी पहाटे एका महिलेच्या घरात शिरल्याच्या तसेच याच भागातील एका महिलेची पूर्वी छेड काढल्याच्या कारणावरून चौघांनी एकाला बेदम चोप दिला. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह रेल्वे भिंतीजवळ टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, चोर समजून केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला आहे, असा दावा मुंब्रा पोलिसांनी केला आहे.
वड्डे व्यंकटय़ा लक्ष्मया (३२), असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी होता. राकेश पटवारी तपरिया (४२), रामसिंग ऊर्फ बादशहा सतरोहनलाल तपरिया (२५), रामसेवक ब्रिजू मोर्या (३२), अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून जया बाळकृष्ण चौधरी (२०) या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. हे सर्वजण दिवा स्टेशन परिसरात राहतात. याच भागात राहणाऱ्या एका महिलेची वड्डे लक्ष्मया याने पूर्वी छेड काढली होती. सोमवारी पहाटे रामसेवक आणि त्याची पत्नी घरात असताना तो त्यांच्या घरात शिरला. या कारणावरून राकेश, रामसिंग या दोघांनी त्याला पकडून नायलॉन दोरीने बांधून ठेवले आणि जया हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रेल्वे भिंतीजवळ टाकून दिला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला नसून चोर समजून केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांनी सांगितले.