गेल्या वर्षी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत स्पॅनिश तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद बादशाह अन्सारी (२८) या घरफोडय़ाला सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी शुक्रवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताच अन्सारी जागीच कोसळला आणि अक्षरश: ढसाढसा रडू लागला.
व्यवसायाने संगीतकार असलेल्या २८ वर्षांच्या स्पॅनिश तरुणीच्या वांद्रे येथील घरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अन्सारी घुसला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अन्सारीने या तरुणीच्या घरात चोरी केलीच; परंतु चाकूचा धाक दाखवत त्याने तिच्यावर बलात्कारही केला. न्यायालयाने शिक्षा सुनावण्याआधी अन्सारीने वृद्ध आई, पत्नी आणि दोन चिमुरडी मुले वाऱ्यावर पडतील, अशी याचना करीत दयेसाठी गयावया केली होती. परंतु आरोपी सुजाण असून गुन्ह्याच्या वेळी आपण काय करीत आहोत याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्याला दया दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांनी केला. अन्सारी सराईत घरफोडय़ा असून बलात्कार केल्यानंतर त्याने तिला ठार करण्याची धमकीही दिल्याचे निकम यांनी सांगितले. त्याने केलेल्या अत्याचारांमुळे ही तरुणी खटल्यासाठी पुन्हा भारतात येऊ शकली नाही. तिच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे तिच्या मनात भारताविषयी वाईट प्रतिमा निर्माण झाली असल्याचे निकम म्हणाले. या खटल्यादरम्यान पीडित स्पॅनिश तरुणीने ‘व्हिडिओ कॉन्फरन्िंसग’द्वारे आपल्यावर बेतलेला प्रसंग न्यायालयात कथन केला. या प्रकरणी तिच्यासह १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.
बलात्काराच्या घटनेच्या काही दिवस आधीच अन्सारीला अभिनेता डिनो मोरीया याच्या घरी चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र तो जामिनावर सुटला होता़