मिरा रोडमध्ये एका तरुणाने मांजरीच्या दोन पिल्लांना आगीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धेश पटेल असं आरोपीचं नाव आहे. सिद्धेश पटेल राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात या मांजरींचा वावर होता. शनिवारी रात्री सिद्धेश याने आग लावली आणि मांजरीच्या पिल्लांना त्यात फेकलं. पोलिसांनी आरोपी सिद्धेशला अटक केली होती. पण काही वेळातच त्याची जामीनावर सुटका झाली.

भक्ती पार्कमधील अजमल रमा हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी दोन महिन्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईसोबत एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवलं होतं. रविवारी रहिवाशांना मांजरी जखमी अवस्थेत आढळल्या. आगीत भाजल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. यासोबत पुठ्ठाही जळाला असल्याचं रहिवाशांनी पाहिलं.

संशय आल्याने काही रहिवाशांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यावेळी सिद्धेश पटेल काडीपेटीच्या सहाय्याने पुठ्ठ्याच्या बॉक्सला आग लावत असल्याचं दिसलं. रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. सीसीटीव्हीत आरोपी सिद्धेश मांजरीच्या पिल्लांना उचलून आगीत फेकत असल्याचंही स्पष्ट दिसत होतं. आगीत होरपळल्याने मांजरीच्या पिल्लांना पळ काढला. इमारतीमधील रहिवासी फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बॉक्स दुसऱ्या बाजूने उघडा असल्याने मांजरी पळ काढू शकल्या’.

आरोपी सिद्धेश पटेल याचा मांजरींना विरोध होता असं रहिवाशांनी सांगितलं आहे. ‘कॉम्प्लेक्समध्ये उंदरांचा त्रास होत असल्याने मांजरींना आणलं होतं. त्यांच्यामुळे बराच त्रास कमी झाला होता’, असं एका रहिवाशाने सांगितलं आहे.