सिग्नल तोडणाऱ्या आणि दंड भरण्यास नकार देणाऱ्या तरुणाची न्यायालयाकडून सुटका

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला वाहतूक पोलीस दंड भरण्यास भाग पाडू शकत नाही. तसेच दंड भरण्यास नकार देणे हे सरकारी कामात अडथळाही ठरू शकत नाही, असा निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला. तसेच सिग्नल तोडणाऱ्या आणि दंड भरण्यास नकार देणाऱ्या तरुणाची सुटका केली.

मोहम्मद शेख (२३) या तरुणाने २०१६ मध्ये कुर्ला येथे सिग्नल तोडला होता. तसेच वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंड भरण्यासही नकार दिला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. शेख याने दंड भरण्यास नकार देतानाच आपल्याशी वाद घालत शिवीगाळ के ली, मारहाण के ल्याचा दावा संबंधित वाहतूक पोलिसाने केला होता.

न्यायालयाने निकाल देताना दंडाची रक्कम भरणे हे ऐच्छिक आहे आणि पोलीस तो भरण्याची सक्ती करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले. आरोपी दंडाची रक्कम भरण्यास तयार नव्हता, तर संबंधित पोलिसाने चलान काढायला हवे होते वा त्याला महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करायला हवे होते. परंतु पोलिसांनी यापैकी काहीही केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित होतो, असेही न्यायालयाने म्हटले.

याप्रकरणी संबंधित पोलिसासह तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली. त्या वेळी सिग्नल तोडल्याप्रकरणी आरोपीच्या नावे चलान काढण्यात आले नसल्याचे या पोलिसांनी मान्य केले. वास्तविक आरोपीने सिग्नल तोडल्यानंतर संबंधित पोलिसाने त्याच्या नावे चलान काढणे अनिवार्य होते. शिवाय न्यायालयासमोर साक्ष नोंदवताना या पोलिसाने घटनाक्रमाबाबत अनेक नव्या बाबी सांगितल्या. या पोलिसाच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) आणि न्यायालयासमोरील त्याच्या साक्षीचा विचार करता त्यात बरीच विसंगती होती. त्यामुळे या पोलिसाची साक्ष विश्वासार्ह म्हणता येणार नाही. तसेच याप्रकरणी स्वतंत्र साक्षीदारही तपासण्यात आला नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.

या सगळ्या बाबींचा विचार करता आरोपीने तक्रारदार पोलिसाला मारहाण केल्याचा कोणताही पुरावा नाही. निव्वळ मोटारसायकलवरून उतरून पोलिसाच्या दिशेने जाणे हा काही गुन्हा नाही. शिवराळ भाषा वापरल्याबाबतही एफआयआर आणि न्यायालयातील साक्षीत विसंगती आहे. त्याबाबतही विश्वास ठेवता येणार नाही. अशा स्थितीत आरोपीने पोलिसाला शिवीगाळ केली की नाही याबाबत साशंकता निर्माण होते, असे नमूद करत न्यायालयाने शेख याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.