शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांना जेवणाचे डबे पुरविणाऱ्या डबेवाल्याचा करोना संसर्गामुळे २८ मेला टिळक रुग्णालयात मृत्यू झाला आहे. वीस वर्षांपासून ते डॉक्टरांना जेवणाचे डबे देत होते.

धारावी येथे राहणारे शिवानंद (नाव बदलले आहे) हे टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह अनेकांचे अन्नदाता. घरापासून दूर राहिलेल्या, २४ तास, ४८ तास काम करणाऱ्या डॉक्टरांना घरच्या जेवणाचा डबा देण्यासाठी ते सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा रुग्णालयात न चुकता हजर असायचे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात त्यांना ताप आणि खोकला सुरू झाला. जवळील दवाखान्यातून उपचार केले तरी खोकला थांबत नसल्याने त्यांना २ मे रोजी टिळक रुग्णालयात दाखल केले. रुग्णांची रांग असल्याने दीड दिवसानंतर त्यांना खाट मिळाली. त्यानंतर त्यांची चाचणी केली गेली. करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.  जवळपास महिनाभर उपचार करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही, अखेर २८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. शिवानंद यांना आजारी पडण्याच्या सहा महिन्यांपूर्वीच क्षयरोग झाला होता. त्याची औषधे त्यांनी पूर्ण घेतली नव्हती. तेव्हा करोना उपचारासोबत त्यांना क्षयरोगाची औषधे देण्यासाठी वारंवार डॉक्टरांना विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ करोनाच्या औषधांनी त्यांच्यात काहीच सुधारणा होत नव्हती. डॉक्टरांनी क्षयरोगाचे उपचार सुरू केले असते, तर कदाचित ते बरे झाले असते, अशी भावना त्यांच्या मुलाने व्यक्त केली. दुसरीकडे, रुग्णालयात करोनाचे रुग्ण असताना आणि भीतीने डॉक्टरांकडे अनेकजण संशयाच्या दृष्टीने पाहात असताना शिवानंद डबे पुरवत होते.