वांद्रे-कुर्ला करोना केंद्रातील अतिदक्षता विभागासाठी खाटेमागे सहा हजार रुपये

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना उपचार केंद्रातील अतिदक्षता विभागाकरिता मनुष्यबळ आणि त्यांचे व्यवस्थापन पुरविण्यासाठी ६ हजार रुपये प्रतिखाटेनुसार खासगी कंपनीला काम सोपवण्यात आले आहे. मात्र करोना उपचारासाठी पालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयाच्या संघटनेने यावर आक्षेप नोंदविला.

महापालिकेअंतर्गत उभारलेल्या वांद्रे-कुर्ला, मुलुंड, दहिसर, वरळी, गोरेगाव येथील करोना उपचार केंद्रातील ६१२ खाटांचे अतिदक्षता विभाग बाह्यसेवा तत्त्वावर कार्यरत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी इच्छुक खासगी संस्थांकडून अर्ज मागविले होते. यातून तीन संस्थांची निवड पालिके ने केली. यातील सर्वात कमी दर प्रस्तावित केलेल्या ‘कार्डियाक केअर’ कं पनीला वांद्रे- कुर्ला येथील ११२ खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात आले आहे. यासाठी सहा हजार रुपये प्रतिखाट हा दर ठरविण्यात आला आहे. अन्य कं पन्यांनी याहून अधिक दर प्रस्तावित केले आहेत. हे दर कमी करण्याकरिता चर्चा सुरू असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संघटनेचा आक्षेप

करोना उपचारासाठी पालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयाच्या संघटनेने मात्र यावर आक्षेप नोंदविला आहे. या खाटांकरिता के वळ मनुष्यबळ पुरविणाऱ्या या संस्थांना पालिका सहा हजार देणार आहे.  मात्र जागेसह वैद्यकीय साहित्य, औषधे यांचा खर्च पालिके ची जबाबदारी असेल. त्यासाठी केवळ तीन हजार देण्यात येणार आहे. हा खर्च केवळ तीन हजारांत होतो का, असा प्रश्न ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्लटंट्स’चे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी विचारला.