25 February 2021

News Flash

कुलपतींच्या हस्तक्षेपावरून वाद

विकासकामे शासकीय कंपनीकडे देण्यास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा विरोध

विकासकामे शासकीय कंपनीकडे देण्यास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा विरोध

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कारभारात शासनाचा अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची टीका पुरती शमली नसताना, आता विद्यापीठांचे कुलपती म्हणजेच राज्यपालांचा दैनंदिन कामकाजात अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची टीका व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या परिसरातील विकासकामे केंद्र शासनाच्या आखत्यारीतील कंपनीकडून करून घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाला दिली असून व्यवस्थापन परिषदेने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

विद्यापीठाच्या कलिना शिक्षण संकुलात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून विकासकांची नेमणूक केली जाते. सध्या कलिना संकुलाच्या विकासकामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबरोबर (एमएमआरडीए) विद्यापीठाचा करार झाला आहे.

मात्र, विकासकामांवर देखरेख करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी केंद्र शासनाच्या आखत्यारीतील ‘इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी’ यांची नमणूक करण्यात यावी, अशी सूचना कुलपतींनी केली आहे. त्याचबरोबर या कामाचा कुलपती कार्यालयाला प्रगती अहवाल देण्याची सूचनाही दिली आहे.

मात्र, नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही सूचना सदस्यांनी फेटाळून लावली. ‘कुलपतींना विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. कोणती कामे कोणत्या कंपनीकडे द्यावीत याची सूचना कुलपतींनी देणे योग्य नाही,’ असे आक्षेप सदस्यांनी घेतले.

निधीचा गैरवापर -युवासेना

’ ‘विकासकामे करण्यासाठी विद्यापीठाचे वास्तुविशारद, अभियंते असताना बाहेरील आस्थापनाची गरज काय? विद्यापीठाच्या निधीचा हा गैरवापर आहे,’ असा आक्षेप युवासेनेचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी घेतला.

’ मुंबई विद्यापीठाचा ‘एमएमआरडीए’बरोबर करार झालेला आहे. तो अस्तित्वात असेपर्यंत दुसऱ्या कंपनीला काम देणे कायदेशीरदृष्टय़ा योग्य ठरले नसते. म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला,’ असे परिषदेचे सदस्य डॉ. बी. एन. जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 3:32 am

Web Title: management council members criticized governor for interfering in mumbai university administration zws 70
Next Stories
1 वरवरा राव यांना जामीन मंजूर करा!
2 कुलसचिवांच्या नियुक्तीचा वाद  : उत्तर दाखल करण्यासाठी वेळ द्या!
3 टाळेबंदीतील नियमभंगाचे गुन्हे मागे -देशमुख
Just Now!
X