केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यातील उमेदवारांनी त्यात चमकदार कामगिरी केली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणाऱ्या गुणवंतांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

बीडमधील अवघ्या तेवीस वर्षांच्या मंदार पत्की याच्या यशाचे सध्या जोरदार कौतूक होत आहे. त्याच्या अभ्यास नियोजनाबाबत सर्वाना असलेले कुतूहल ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरु’ वेबसंवादातून शमवता येणार आहे. येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होणार आहे.

मंदारने यूपीएससीच्या परीक्षेत देशभरातून २२वा क्रमांक पटकावला. अनेक वर्षे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची वारी करून आणि जोरदार अभ्यास करूनही कित्येकांना जे जमत नाही, ते पहिल्याच प्रयत्नांत मंदारने करून दाखविले.

अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या मंदारने हे कसे साध्य केले, ते जाणून घेण्याची संधी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे. आदर आणि अधिकार देणारी सरकारी नोकरी मिळवून देणाऱ्या स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. याच परीक्षेत यश मिळवलेल्या मंदारच्या यशाचा मार्ग कसा होता, त्याने अभ्यास कसा केला, कोणती पुस्तके  आणि संदर्भ साहित्य वापरले या साऱ्या प्रश्नांची उत्तरे  ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरु’ या वेबसंवादातून जाणून घेता येतील.

वेबसंवादात सहभागी होण्यासाठी : https://tiny.cc/SpardhaParikshaGuru_10Aug  येथे नोंदणी आवश्यक.