विरारमधील ‘मंदार रिअ‍ॅल्टर्स’ गृहप्रकल्प गैरव्यवहार

वसई : विरारमधील मंदार रिअ‍ॅल्टर्स गृहप्रकल्पात प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचीही ३८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पौडवाल यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच मेसर्स ओम मंदार रिअ‍ॅल्टर्स या कंपनीच्या सात संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व संचालक फरार आहेत. त्यांनी अनेकांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली आहे.

पौडवाल यांनीही या गृहप्रकल्पात २०१३ मध्ये दोन सदनिकांची नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी ३८ लाख रुपये भरले होते. मात्र त्यांचीही फसवणूक करण्यात आली. त्यांनी सोमवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पौडवाल यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा ग्राहकांनी तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणात संचालक अविनाश ढोले आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

ओम मंदार रिअ‍ॅल्टर्सचे संचालक राजू सुलिरे, अविनाश ढोले आणि त्यांच्या पाच साथीदारांनी विरारच्या नारिंगी येथे मंदार एॅव्हेन्यू एफ १ नावाचा गृहप्रकल्प विकसित केला होता. त्यात ग्राहकांना वेळेत सदनिका आणि वाणिज्य गाळ्यांचा ताबा दिला गेला नाही.