वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने दुचाकी चालवताना एखाद्या चौकात अचानक वेग कमी होतो, गाडीच्या आरशाला अडकवलेले हेल्मेट दुचाकी चालू असतानाच एका हाताने काढून डोक्यावर घातले जाते, दुचाकी पुन्हा भरधाव निघते आणि चौकातील वाहतूक पोलिसांना वाकुल्या दाखवत पुढे जाते, पुन्हा हेल्मेट डोक्यावरून बाजूला होते आणि आरशाच्या दांडय़ाच्या आधाराने विसावते.. कोणत्याही महानगरातील हे दृश्य बदलण्यासाठी आता परिवहन विभागानेच कंबर कसली आहे. दुचाकी गाडीचा परवाना देतेवेळी चालकाकडून हेल्मेट वापराबाबतचे बंधपत्र सही करून घेण्याचा आदेश परिवहन विभागाने काढला असून, गुरुवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
हेल्मेटचा वापर हा सुरक्षेसाठी असतो, ही संकल्पना अद्याप तरी राज्यात रुजलेली नाही. हेल्मेट वापराच्या जागृतीसाठी परिवहन आयुक्तालयाने आता ‘बंधपत्र’ घेण्याचे ठरवले आहे. हे बंधपत्र परवाना देतानाच चालकांकडून सही करून घेतले जाणार आहे. ‘दुचाकी वाहन चालवताना चालकाने तसेच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने स्वत:च्या सुरक्षेच्या कारणास्तव हेल्मेट वापरणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे, याविषयी मला जाणीव करून दिली आहे. तसेच या तरतुदीचे मी पालन करेन, अशी हमी या बंधपत्राद्वारे मी देतो’, असे या बंधपत्रात लिहिले असेल. गुरुवारपासूनच या बंधपत्रावर चालकांची सही घेतली जाणार आहे. मात्र हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर होणारी कारवाई ही पूर्वीसारखीच मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसारच असेल.