06 March 2021

News Flash

सहज सफर : चल, आंब्याच्या वनात जाऊ!

माधुर्याचा अमृतानुभव देणारे आंबा हे फळ सर्वाचेच लाडके.

 

चांदण्यांची पांघरून शाल

लुटू आनंद धुंद खुशाल

बघु नवतीचा दुनियेचा नूर

आंबेवनात जाऊ या दूर

ऐंशीच्या दशकात रेडिओवर वाजणारे हे गीत. गर्द आमराईविषयी अनेकांच्या अनेक आठवणी आहेत. पूर्वी कोकणात गावावरून जाऊन आलेले लोक तेथील आमराईविषयी भरभरून बोलत. हिरवेगार, आम्रवृक्षांनी बहरलेले हे वन वातावरणात गारवा तर निर्माण करतेच, पण मानवी मनालाही प्रफुल्लित आणि प्रसन्न करते. मुंबई, ठाण्यामध्ये इमारतींच्या अरण्यात डेरेदार वृक्षच नावाला असल्याने तिथे सदाबहार आम्रवन असणार तरी कसे! पण शहरातील धकाधकीच्या आयुष्यातून घटकाभर निवांतपणा मिळावा यासाठी कल्याणपासून काही किलोमीटर अंतरावर अंबरनाथ तालुक्यात एक आमराई फुलली आहे. हिरवाईने नटलेले, टवटवीत आणि सदाबहार असलेले हे आंबेवन म्हणजे मानवी कृतीतून तयार झालेला नैसर्गिक ठेवाच.

अंबरनाथ तालुक्यातील पोसरी आणि करवले या गावांच्या दरम्यान कृष्णा म्हात्रे या व्यक्तीने तब्बल २० एकर जागेमध्ये आमराई फुलवली आहे. मूळचे डोंबिवली येथील असणारे कृष्णा म्हात्रे निसर्गप्रेमी. त्याच उद्देशाने त्यांनी १५ वर्षांपूर्वी पोसरी येथे २० एकर जमीन घेतली. अगदी उजाड माळरान असलेल्या या जमिनीवर त्यांनी आंब्याची लागवड केली आणि आता हे आम्रवन परिसरात पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आलेले आहे. कृष्णा म्हात्रे आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी या आम्रवनात विशिष्ट अंतरांवर पाच बंगले बांधले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडते, अशा निसर्गप्रेमींनी येथे यावे आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा हा त्यामागील उद्देश. या बंगल्यांमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली जाते.

म्हात्रे यांच्या या आमराईत आंब्याची तब्बल ७०० झाडे आहेत. त्यांपैकी जवळपास ६०० झाडे हापूस आंब्याची आहेत, तर इतर झाडे पायरी, दशरा, आम्रपाली, केसर आदी प्रकारांतील आहेत. त्याचबरोबर रामफळ, अननस, नारळ, जांभूळ आदी फळझाडे आणि काही विशिष्ट फुलझाडे येथे पाहायला मिळतात.

माधुर्याचा अमृतानुभव देणारे आंबा हे फळ सर्वाचेच लाडके. रसना तृप्त करणाऱ्या या रसाळ फळाचा आस्वाद घेण्यासाठी सारेच आतुर असतात. याच उद्देशाने येथे आमराई फुलविण्यात आल्याचे म्हात्रे सांगतात. पूर्वी उन्हाळय़ाच्या किंवा दिवाळीच्या सुटीत मुले ‘मामाच्या गावा’ला जायची. पण आता ‘मामाचा गाव’च राहिला नसल्याने शहरांतील मुलांना निसर्गाचा आस्वाद लुटता यावा यासाठी हे आम्रवन विशेष आकर्षण ठरत आहे. सुटींच्या दिवसांत अनेक कुटुंबे येतात, शाळांच्या सहली येतात. लहान मुले येथे बागडतात, खेळतात.. दगड मारून आंबे पाडायचा आनंद लुटतात. अनेकांना आंबा वृक्ष, त्याचा मोहोर, आंब्याचे प्रकार याची माहिती नसते, ती येथे दिली जाते.

म्हात्रे यांनी पाच वर्षांपूर्वी या आमराईचे रूपांतर कृषी पर्यटन केंद्रात केले असून त्याला ‘निसर्ग माऊली कृषी पर्यटन’ असे नाव दिले आहे. निसर्गावर प्रेम आहे, निसर्गाच्या सान्निध्यात रमावेसे वाटते अशांसाठीच हे पर्यटन केंद्र तयार करण्यात आल्याचे म्हात्रे सांगतात. मे-जून महिन्यांत झाडाला आंबे लागण्याच्या काळात येथे आंबे विकत घेण्यासाठी परिसरातील अनेकांची गर्दी होते. अगदीच रास्त दरात येथे आंबे विकत दिले जातात.

शहरी भागात निसर्ग नावालाच उरलेला आहे. त्यामुळे आरोग्यदायी विसावा कुठून मिळणार? हा प्रश्न आपल्याला या आंबेवनात आल्यावर पडणार नाही. हिरव्या रंगाने नटलेली ही आमराई निसर्गप्रेमींसाठी नंदनवनच आहे, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

निसर्ग माऊली पर्यटन केंद्र, पोसरी, ता. अंबरनाथ.

कसे जाल?

  • कल्याणहून मलंगगड रस्त्याने पुढे गेल्यास नेवाळी फाटय़ाच्या पुढे उसाटणेला जाणारा एक फाटा लागतो. या फाटय़ावरून सहा किलोमीटर अंतरावर ही आमराई आहे.
  • ठाण्याहून शीळ फाटा मार्गे, बदलापूर जंक्शन येथून नेवाळी फाटा आणि त्यापुढे या पर्यटन केंद्रापाशी जाता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:15 am

Web Title: mango forest at ambernath
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : वाचण्याचे नाही, पाहण्याचे पंडित!
2 कामत यांच्या कोणत्या मागण्या काँग्रेस मान्य करणार?
3 श्रीरामपूरचा लखनलाल भुरेवाल, तर उस्मानाबादमधील आस्तिक काळे ‘ब्लॉग बेंचर्स’चे मानकरी
Just Now!
X