09 March 2021

News Flash

ओशिवऱ्यात खारफुटींना आगी लावण्याचे सत्र

ओशिवरा नदी ज्या ठिकाणी खाडीला मिळते त्या ठिकाणी खारफुटींचे क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे.

महिनाभरापासून प्रकार; तक्रारींनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

ओशिवरा नदीलगत भगतसिंग वस्तीनजीक असलेल्या खारफुटीला आग लावण्याचे सत्र महिन्याभरापासून सुरू आहे. खारफुटी जाळण्याचा प्रकार २५ डिसेंबरपासून सुरू होता. मात्र मध्यंतरी थांबलेला हा प्रकार गेल्या चार दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याची माहिती  ‘द लोखंडवाला ओशिवरा सिटिझन वेल्फेअर असोसिएशन’ने दिली आहे. या समस्येबाबत असोसिएशनकडून वारंवार पाठपुरावा करूनदेखील संबंधित प्रशासनाकडून कारवाईस दिरंगाई होत आहे. त्यामुळे खारफुटींचा हा संपूर्ण हरित पट्टा नष्ट होत चालला आहे.

ओशिवरा नदी ज्या ठिकाणी खाडीला मिळते त्या ठिकाणी खारफुटींचे क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. येथील खारफुटीला आग लावण्यात येत असल्याचे गतवर्षी २५ डिसेंबरपासून उघड झाले. या खारफुटींशेजारी असलेल्या भगतसिंग आणि नयानगर वस्त्यांमधून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आगी लावण्यात येत असून ही आग खारफुटींनाही आपले भक्ष्य बनवत आहे. हा भूभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असून या संदर्भात ‘द लोखंडवाला ओशिवरा सिटिझन वेल्फेअर असोसिएशन’ने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली  होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने कांदळवन संरक्षण विभागाला या परिसराची पाहणी करून चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.

कांदळवन विभागाने आपला चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. साधारण एक हेक्टर कांदळवनांच्या जागेत उभारण्यात आलेल्या घरांवर कारवाई करावी, अशी शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली आहे. येथील नया नगर वस्तीमधील रहिवाशांकडून खारफुटींमध्ये कचरा टाकून जाळला जात असल्याने खारफुटीचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्याचे कांदळवन संरक्षण विभागाच्या पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी सांगितले. शिवाय उपग्रह छायाचित्रणाच्या माध्यमातून केलेल्या निरीक्षणात २००५ पूर्वी या भागात मोठय़ा प्रमाणात खारफुटींचे अस्तित्व होते. मात्र कालांतराने खारफुटी नष्ट करून त्यावर वस्ती उभारली गेल्याची माहिती त्यांनी दिली. कांदळवन विभागाने चौकशी अहवाल सादर केल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने खारफुटी नष्ट होण्याची भीती द लोखंडवाला ओशिवरा सिटिझन वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य धवल शहा यांनी व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:54 am

Web Title: mangrove fire issue at oshiwara
Next Stories
1 पालिकेच्या १२ शाळांना टाळे?
2 काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून भाजपची कोंडी
3 विकासाला गती देण्यासाठी अतिरिक्त निधी उभारणार
Just Now!
X