जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाईत चालढकल

ओशिवरा येथील खारफुटीला आग लावण्याचे प्रकरण ताजे असताना वर्सोवा खाडीनजीक मत्स्य विद्यापीठ रस्ताला लागून असलेल्या खारफुटींनाही आग लावण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. येथील खारफुटीला मंगळवारी आग लावल्याची तक्रार येथील ‘न्यू यारी रोड रेसिडन्स ट्रस्ट’ने केली आहे.

काही वर्षांपासून येथील खारफुटींमध्ये मातीचे ढीग रचून आणि त्यांना आग लावून हा संपूर्ण हरित पट्टा नष्ट केला जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही संबंधित विभाग कारवाईत चालढकल करीत असल्याची तक्रार रहिवासी करीत आहेत. उपनगरातील बहुतांश तिवरांचा भूखंड हा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येतो. मात्र काही दिवसांपासून उपनगरात खारफुटी नष्ट करण्याच्या घटना सातत्याने होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास खाडी क्षेत्रातील समृद्ध खारफुटीचा परिसर नाहीसा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दोन ट्रक  भरून आणलेल्या काडेपेटय़ांचे खोके खारफुटींमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर आग लावली गेल्याची माहिती ‘यारी रोड बचाव गुप्र’चे सदस्य समीर कपूर यांनी दिली.

तक्रार करूनही अधिकारी कारवाईचा देखावा करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.