News Flash

 ‘मॅनहोल’चे झाकण ४८ तासांत दुरुस्त

पावसाळ्यात रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडे ठेवल्याने डॉ. दीपक अमरापूरकर यांना जीव गमवावा लागला.

उघडय़ा गटारासंबंधी माहिती मिळाल्यावर त्यापुढील ४८ तासांमध्ये सदर मॅनहोल बंद करण्यात आले

पालिकेच्या मासिक बैठकीत निर्णय

रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडे किंवा धोकादायक स्थितीत असल्यास ते ४८ तासांच्या आत दुरुस्त करण्याच्या सूचना महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयास देण्यात आल्या आहेत. झाकणांची कमतरता तसेच इतर कारणांमुळे अनेक महिने गटार उघडे राहत असल्याच्या घटना उघडकीस आल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या नोव्हेंबर महिन्याच्या मासिक बैठकीत घेण्यात आला.

पावसाळ्यात रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडे ठेवल्याने डॉ. दीपक अमरापूरकर यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गटाराच्या नादुरुस्त व धोकादायक स्थितीतील झाकणांची समस्या पुन्हा चर्चेत आली. अनेक ठिकाणी रस्त्यावरील गटाराची झाकणे झाडाच्या फांद्या लावून किंवा दगडांची रांग रचून ‘सुरक्षित’ ठेवण्याच्या पालिकेच्या प्रथेवर अंगुलीनिर्देश करण्यात आल्यानंतर झाकणांसंदर्भात पालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली. गटाराचे उघडे किंवा धोकादायक परिस्थितीत असल्यास संबंधित वॉर्ड कार्यालयाने तातडीने सुरक्षेची उपाययोजना करावी, अशा सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी आधीच दिल्या होत्या. मात्र वॉर्ड कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तात्पुरत्या सोयीनंतरही अनेक दिवस गटाराची झाकणे उघडी राहत होती. ही झाकणे लावायची जबाबदारी विविध खात्यांकडे असून झाकणांची कमतरता, कमी मनुष्यबळ तसेच इतर कारणे पुढे करून झाकणे लावण्यास विलंब होत असे. त्यामुळे संभांव्य अपघात टाळण्यासाठी पालिकेच्या मासिक बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या, मलनि:सारण, मलनि:सारण प्रचालन, जल अभियंता अशा विविध खात्यांद्वारे रस्त्यांवरील गटाराची झाकणे बसवली जातात. त्यामुळे उघडय़ा गटारांच्या सुरक्षेची उपाययोजना केल्यावर वॉर्ड कार्यालयाने संबंधित खात्याच्या मध्यवर्ती कार्यालयाला तातडीने कळवणे अपेक्षित आहे. मध्यवर्ती कार्यालयाला उघडय़ा गटारासंबंधी माहिती मिळाल्यावर त्यापुढील ४८ तासांमध्ये सदर मॅनहोल बंद करण्यात आले पाहिजे, असे आयुक्त मेहता यांनी बैठकीत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 5:05 am

Web Title: manhole cover replacement in 48 hours
Next Stories
1 मोबाइल तिकीट अ‍ॅपचा उत्साह जास्त, प्रतिसाद कमी
2 कमकुवत जिल्हा बँका मोडीत?
3 मुख्यमंत्र्यांचे दोन विशेष कार्यकारी अधिकारी वादात
Just Now!
X