personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

मुंबईला स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई हे क्रांतीचे केंद्र बनले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सभा, चळवळी मुंबईत होत असत. गांधीजी मुंबईत आल्यावर गिरगाव येथील मणिभवन येथे राहत असत. १९१७ ते १९३४ या काळात गांधीजी मुंबईत आल्यानंतर मणिभवन येथेच वास्तव्याला होते. गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीचे हे एक केंद्रच झाले होते. गांधीस्पर्शाने पावन झालेले मणिभवन सध्या प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. येथे गांधीजींच्या स्मरणार्थ संग्रहालय आणि ग्रंथालय बनविण्यात आलेले आहे.

गिरगाव चौपाटीजवळच लेबरनम मार्गावर मणिभवन आहे. साधे व सुंदर संग्रहालय, जणू गांधीजीवनच उलगडते. ही इमारत रविशंकर झवेरी आणि मणी कुटुंबाची होती. ते गांधीजींचे मित्र होते. गांधीजी मुंबईत आल्यावर ते त्यांचा पाहुणचार करीत. याच इमारतीतून गांधीजींनी असहकार चळवळ, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलापत चळवळींना प्रारंभ केला. १९५५ मध्ये ही इमारत ‘गांधी स्मारक निधी’ने गांधीजींचे स्मारक म्हणून ताब्यात घेतली. आज अनेक लोक गांधीजींचे चरित्र आणि जीवनपट जाणून घेण्यासाठी या इमारतीला भेट देतात.

गांधीजींच्या जीवनावरील विविध पुस्तके, विविध माहितीपट, विविध शिल्पे, छायाचित्रे, चित्रे येथे पाहायला मिळतील. तळमजल्यावरच ग्रंथालय आहे. येथे तब्बल ४० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. गांधीजीवनावरील विविध लेखकांची आणि गांधीजींनी स्वत: लिहिलेली अनेक पुस्तके येथे मिळतील. येथे वाचण्याचीही सोय असल्याने वाचकांना मनसोक्त वाचनही करता येऊ शकते.

गांधीजी मणिभवनमधील ज्या खोलीमध्ये राहत होते, ती खोलीही पाहता येते. या खोलीत गांधीजी ज्या चरख्यावर सूत कातायचे, तो चरखा, गांधीजींची बैठकव्यवस्था, झोपण्याची गादी, दूरध्वनी संच येथे पाहायला मिळतो.

पहिल्या मजल्यावर गांधीजींवरील विविध चित्रपट, माहितीपट, लघुपट यांचा संग्रह आहे. तिथे या संदर्भातील मोठय़ा डिस्क मिळतील. फिल्म पाहण्याची सर्व यंत्रणा येथे उपलब्ध आहे.

गांधीजींचे जीवनचरित्र उलगडणारे एक चित्र आणि छायाचित्र दालन मणिभवनमध्ये आहे. गांधीजींचे तारुण्य जीवन, दक्षिण आफ्रिकेतील प्रसंग, स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलने आदी या चित्रांमधून रंगवण्यात आली आहेत. गांधीजींच्या जीवनावरील बाहुलीशिल्पेही येथे पाहायला मिळतात. गांधीजीवनावरील विविध प्रसंग या बाहुलीशिल्पांतून साकार करण्यात आले आहेत. गांधीजींची आंदोलने, परदेशी वस्तूंची होळी, त्यांच्यावरील खटला आदी प्रसंग या बाहुलीशिल्पांतून हुबेहूब वठवण्यात आले आहेत. त्याशिवाय गांधीजींवर आधारित विविध देशांची पोस्टाची तिकिटे, विविध वृत्तपत्रांमध्ये गांधींबाबत आलेल्या वृत्तांची कात्रणेही येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ४ जानेवारी १९३२ रोजी गांधीजींना ब्रिटिश सरकारने ज्या ठिकाणाहून अटक केली, ते ठिकाण येथे पाहायला मिळते. एकूणच गांधीजींच्या जीवनपटाला उजाळा देण्याचे काम मणिभवनने केले आहे.

गांधीस्मारक बनल्यानंतर मणिभवन देशातील कोटय़वधी जनतेचे प्रेरणास्रोत बनले आहे. आजही शेकडो लोक या ठिकाणाला भेट देतात. अनेक परदेशी नागरिक मुंबईत आल्यावर आवर्जून मणिभवन पाहण्याचा आग्रह धरतात आणि भारताच्या राष्ट्रपित्याच्या स्मृतीला उजाळा देतात.

कसे जाल?

  • मणिभवनजवळील सर्वात जवळचे स्थानक चर्नी रोड आहे. तेथून चालत वा टॅक्सीने येथे जाता येते.
  • चर्चगेट, मरीन लाइन्स स्थानकाबाहेरून टॅक्सीने थेट जाता येते.
  • वेळ : सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.००