सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये धुमसत असलेल्या संघर्षांची झळ शुक्रवारी उपसभापती वसंत डावखरे यांना बसली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलू न दिल्याने नेहमी संयमी असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांनी अचानक रूद्रावतार धारण करीत थेट पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापतींचा निषेध केला. आणि उपसभापतींनीही दिलगिरी व्यक्त केल्याची घटना आज सभागृहात घडली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा आज अखेरचा दिवस. काही सदस्यांची भाषणे झालेली तर काही आपला क्रमांक लागण्याच्या प्रतीक्षेत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आगमन झाले. त्यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे अभिभाषणावर बोलण्याच्या तयारीत असतांनाच मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. त्यावर आपल्याला बोलू देण्याची विनंती ठाकरे यांनी उपसभापतींकडे केली. डावखरे यांनी ठाकरे यांची परवानगी अमान्य करीत मुख्यमंत्र्याना भाषण सुरू करण्याची अनुमती दिली. त्यावर आक्रमक झालेल्या ठाकरे यांनी रूद्रावतार धारण करीत तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावरून कामकाज करीत आहात हे आम्हाला माहीत आहे,असे सांगत उपसभापतींचा निषेध केला. आपल्यावर झालेल्या हेत्वारोपाने अस्वस्थ झालेल्या डावखरे यांनीही आपण सांगितलेले सदस्य ऐकणारच नसतील, प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असतील तर पिठासीन अधिकारी काय करणार अशी नाराजी व्यक्त करीत आपणच सदनाची दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले.