मुंबईमधील माटुंगा येथील लोकप्रिय मणीज लंच होम या हॉटेलचे मालक के. एस. नारायणस्वामी यांचं मंगळवारी (२० ऑक्टोबर २०२० रोजी) संध्याकाळी निधन झालं. चंद्रन या टोपण नावाने ओळखले जाणारे नारायणस्वामी हे ६७ वर्षांचे होते. के. जे. सोमय्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मांटुग्यामध्ये चंद्रन यांनी मणीजची स्थापना केली होती. काही कालावधीपुर्वीच हे हॉटेल चेंबूरला हलवण्यात आलं होतं. मात्र या हॉटेलचा पत्ता बदलल्यानंतरही तेथील पदार्थांच्या चवीमुळे गर्दी कधीच कमी झाली नाही.

मागील बऱ्याच काळापासून चंद्रन यांना प्रकृतीसंदर्भातील समस्या होत्या अशी माहिती मागील चार दशकांपासून त्यांना ओळखणाऱ्या जवळच्या मित्राने ‘मिड डे’शी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वीच प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळेच त्यांच्या यकृतावर परिणाम झाला होता. उपचारादरम्यान रात्री आठच्या सुमारास त्यांचे निधन झालं.

चंद्रन यांनी अगदी शुन्यातून मनिजची सुरुवात केली होती. मनिजची मूळ जागा चंद्रन यांना सोडावी लागल्याचे त्यांचे जवळचे मित्र सांगतात. एका बांधकाम व्यवसायिकाला या जागी इमारत उभी करायची असल्याने नाइलाजास्तव चंद्रन यांना ही जागा सोडावी लागली. मात्र त्यानंतरही चंद्रन यांनी हार मानली नाही आणि चेंबूरमध्ये हॉटेल सुरु केलं. पाच वर्षांच्या भाडे तत्वावर जागा घेऊन चंद्रन यांनी नव्या जागी व्यवसाय सुरु केला. मागील वर्षापासून चंद्रन यांनी हॉ़टेलमध्ये जाणं बंद केलं होतं. त्याचा लहान भाऊ राजमणी हेच सर्व गोष्टींकडे लक्ष देत होते.

२०१८ साली मणीज लंच होमने द गाईड रेस्तराँ अवॉर्ड २०१८ या पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट कमबॅकचा पुरस्कार जिंकला होता. यावेळी चंद्रन पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. चंद्रन यांच्या निधनाच्या वृत्तानंतर हळहळ व्यक्त होत आहे.