व्हिवा लाऊंज म्हणजे कर्तृत्ववान महिलांचे व्यासपीठ. या लाऊंजच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची जडणघडण आणि त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला आहे.  आत्तापर्यंत आपल्याला ख्यातनाम अभिनेत्री सोनाली बेंद्रे, आर जे मलिष्का, नेमबाज अंजली वेदपाठक, पटकथालेखिका ऊर्मी जुवेकर, गायिका बेला शेंडे, दिग्दर्शिका गौरी शिंदे, संगीतकार स्नेहा खानवलकर, सुप्रिया सुळे, आरती अंकलीकर- टिकेकर अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधला. आता लाऊंजच्या माध्यमातून (शुक्रवार २९ मार्च) मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर-म्हैसकर आपल्या भेटीस येत आहेत. प्रशासकीय सेवांमध्ये मनीषा म्हैसकर या राज्यातील एक आघाडीच्या व कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत.
 केंद्रीय प्रशासकीय सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू पाहणाऱ्या तरुणींसाठी मनीषा म्हैसकर यांची भेट ही एक उत्तम संधी आहे. प्रत्यक्ष भेटीदरम्यान मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर आपल्याला दृष्टिक्षेप टाकता येईल. त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शनही मिळणार आहे.  त्या १९९२च्या बॅचच्या आयएएस असून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद स्वीकारण्याआधी त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक म्हणून काम केले आहे.
वर्धा व सांगली जिल्ह्य़ांत अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी पदांची जबाबदारी म्हैसकर यांनी बजावली आहे. या ठिकाणी कार्यरत असताना पाणीटंचाईचा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे हाताळला होता. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणि जलसंधारणाद्वारे शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांनी राबविलेल्या जलदा, संपदा आणि वसुंधरा या उपक्रमांचे चांगलेच कौतुक झाले. कर्मचारी आणि लोकांचा सहभाग या दोन्हीच्या बळावर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यात त्यांना यश आले होते. मनीषा म्हैसकर यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला होणार आहे. तसेच सरकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव, व्यक्तिगत जीवनाचे अनेक पैलू या निमित्ताने व्हिवा लाऊंजमध्ये उलगडले जाणार आहेत.
व्हिवा सेलिब्रिटी गेस्ट एडिटर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मनीषा म्हैसकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत.  २९ मार्चला प्रभादेवीच्या ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या मिनी थिएटरमध्ये दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सादर होणार असून हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.