भायखळा येथील ऑर्थर रोड तुरुंगात मंजुळा शेट्येची हत्या झाली होती. या प्रकरणात २० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. मंजुळा शेट्येचा शवविच्छेदन अहवालही आज न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी येत्या २० दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत असे न्यायालयात सांगितले.

कैद्यांना देण्यात येणारी अंडी आणि पाव यांचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करून ऑर्थर रोड तुरुंगात मंजुळा शेट्येला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण ६ पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

मंजुळाला मारहाण झाल्यानंतर भायखळा जेलमध्ये महिला कैद्यांनी गच्चीवर जाऊन आंदोलन केले होते. शीना बोरा हत्याकांडात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने, मंजुळा प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. आता या प्रकरणी २० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

भायखळा तुरुंगात २३ जून २०१७ रोजी  मंजुळा शेट्येला जबरदस्त मारहाण

२४ जून २०१७ रोजी मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा मृत्यू

मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी सहा पोलीस अधिकाऱ्यांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप

दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याच्या कारणावरून मंजुळा शेट्येला एका बॅरेकमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली, पोलिसांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप

या सगळ्या प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिला कैद्यांना धीर देत बोलते केले, ज्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीनेही मंजुळा शेट्ये प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.