भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणात मंगळवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मंजुळा शेट्येची हत्या झाली असून या प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. इंद्राणी मुखर्जी, वैशाली मुदळेच्या जबाबाचा आरोपपत्रात समावेश असून, मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलेला नाही.

वॉर्डन मंजुळा शेट्येचा २४ जून रोजी पहाटे मृत्यू झाला होता. अंडी आणि पावाच्या हिशेबावरुन तुरुंगातील सहा महिला अधिकाऱ्यांनी मंजुळाला अमानुष मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या मंजुळाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र महिला कैद्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाची दखल घ्यावी लागली. याप्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने सोमवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे ९०० पानांचे हे आरोपपत्र असून, यात सहा अधिकाऱ्यांवर हत्या, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे असा आरोप आहे. मात्र यात लैंगिक अत्याचाराच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला नाही.

शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी तसेच भ्रष्टाचाराप्रकरणी तुरुंगात असलेल्या वैशाली मुदळेच्या जबाबाचाही आरोपपत्रात समावेश आहे. याशिवाय तपासात सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटल्याचे समजते. पोलिसांनी १८२ साक्षीदारांचा जबाब घेतला असून यात तुरुंगातील ९७ कैद्यांचा समावेश आहे.

काय होते प्रकरण?
हत्येच्या तीन महिन्यांपूर्वी मंजुळा भायखळा तुरुंगात आली होती. हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेली मंजुळा पेशाने शिक्षिका होती. भायखळ्यापूर्वी मंजुळा पुण्यातील येरवडा तुरुंगात होती. पुण्यात मंजुळाने महिला कैद्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला होता. निरक्षर महिला कैद्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि आपल्या हक्कांबाबतही जागृत केले. भायखळा तुरुंगात आल्यावरही मंजुळाने हेच काम केले होते. त्यामुळे मंजुळा कैद्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. जेलर, अन्य वॉर्डन, गार्ड किंवा महिला पोलिसांऐवजी कैद्यांकडून मंजुळाचा शब्द पाळण्यात येत होता. कारागृह अधिकारी मनीषा पोखरकर व पाच महिला गार्ड यांच्या मनात मंजुळाबाबत यामुळेच खदखद होती असे सांगितले जाते.