पुरस्कार प्रदान सोहळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रतिपादन

‘‘महान व्यक्ती जन्म घेतात तेव्हा जगाला आशेचा किरण मिळतो. कांची महास्वामी हे शारीरिक अपंगावर मात करत यश मिळवण्याच्या माणसाच्या आंतरिक प्रेरणेचे उदाहरण आहे. यातून माणसाच्या स्वभावाची सकारात्मक बाजू समोर येते. त्यांच्या शिकवणीने लोकांच्या विचारांमध्ये बदल घडून आला आणि त्यांचे आयुष्य बदलले,’’ असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले.

‘द साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’ने आयोजित केलेल्या २१ व्या श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनेन्स पुरस्कार सोहळ्यात मनमोहन सिंग यांना त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्यासाठी गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘‘आजतागायत केवळ प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. परिणामांची चिंता न करता माझे कर्तव्य मी करत राहिलो. काही वाईट अनुभव आले तेव्हा स्वत:ला निराश होऊ  दिले नाही. मिळेल तेवढय़ा यशात समाधानी राहिलो. मला मिळालेल्या कोणत्याही यशासाठी कौतुकाची अपेक्षा ठेवली नाही’’, असे डॉ. सिंग म्हणाले. यावेळी डॉ. सिंग यांच्यासह गणितज्ज्ञ मंजुळ भार्गव,  नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, धार्मिक गुरू स्वामी चिदानंद सरस्वती आणि जपानी लेखक, तत्त्वज्ञ डॉ. सेंगाकू मायेदा यांचाही गौरव करण्यात आला. यापैकी मायेदा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘एक गणितज्ज्ञ म्हणून थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १३७ व्या जयंतीदिनी कांची महास्वामी यांच्या नावे पुरस्कार घेताना आनंद होत आह’’, असे प्रा. भार्गव म्हणाले. ‘‘आज आपल्यासमोर असलेले यशवंत हे त्यांच्या संस्कृतीला धरून आहेत. यावरुन हेच सिद्ध होते की, यशस्वी होण्यासाठी संस्कृतीपासून दूरावण्याची गरज नाही’’, असे चिदानंद सरस्वती म्हणाले.  ‘‘डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली अग्नी क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करताना मी कांची महास्वामींना भेटलो होतो. तेव्हा विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले होते’’, असे व्ही. के. सारस्वत म्हणाले.