संदीप आचार्य, मुंबई

मानसिकदृष्टय़ा खचलेल्या पूरग्रस्तांची मनोवस्था पूर्वपदावर आणून त्यांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची पथके कोल्हापूर सांगली जिल्ह्य़ात कार्यरत झाली आहेत. कोल्हापूर व सांगलीमधील वेगवेगळ्या शिबिरांमध्ये तसेच महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय तपासणीबरोबरच मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे कामही केले जाते.

कोल्हापूर व मिरज वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथून वैद्यकीय मदतीचे नियोजन केले जात आहे. घरदार, शेतीभाती, कागदपत्रांपासून वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्यांना तसेच आता आपले काय होणार ही भावना अनेकांच्या मनात घर करून असल्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर दिला जात आहे. गेल्या सहा दिवसांत दहा हजारांहून अधिक रुग्णांना या मनोधैर्य मोहिमेचा दिलासा मिळाला आहे. सांगली व कोल्हापूरमधील सुमारे पाच लाख लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या दोन्ही शहरांत मिळून सुमारे ६०० शिबिरांमधून हजारो लोकांची राहण्याची व्यवस्था केली असून आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे शेकडोंनी डॉक्टर येथे तळ ठोकून आहेत. कोल्हापुरातच वैद्यकीय महाविद्यालयातील सव्वाशे विद्यार्थी घराघरात जाऊन रुग्णांची माहिती घेत आहेत, असे नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले. डॉ. ठाकूर व अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे व मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या साहाय्यासाठी पाठविण्यात आले आहे.

नंदुरबार, मिरज, अंबेजोगाई व सीपीआर कोल्हापूर येथील डॉक्टरांच्या पथकांनी या दोन्ही जिल्ह्य़ांत मिळून दहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार दिला आहे. पूरस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेलेली असते. अशा वेळी रुग्णांना मानसिक आधाराची मोठी गरज असते. या भागांत सहा ट्रक भरून औषधे पाठविण्यात आली आहेत.

– डॉ. तात्याराव लहाने,  वैद्यकीय शिक्षण संचालक