मनोहर जोशी यांचे ‘अवघे पाऊणशे वयोमान’ प्रकाशित

‘आयुष्य कसे जगावे’ या पुस्तकातून ‘पुढची पिढी’ घडविण्याचे इंगित सांगणारे माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयोमान’ या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादरच्या शिवाजी मंदिरात रविवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि खुसखुशीत कोपरखळ्यांमुळे रंगतदार झाला.

मनोहर जोशी यांचे ‘धंदा कसा करावा’ हे पुस्तकही यापूर्वीच प्रकाशित झाले आहे. ‘पैसा हे सर्व समस्यांवर मात करण्याचे साधन आहे, त्यामुळे पैसा कमावणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय होते’, असा ‘गौप्यस्फोट’ मनोहर जोशी यांनी या सोहळ्यात बोलताना केला, आणि मग कोपरखळ्यांची मैफल रंगत गेली. ‘मनोहर जोशी यांच्या पैसे कमावण्याच्या साऱ्या कल्पना आपल्याला माहीत आहेत, पण त्या उघड करण्याची ही वेळ नाही’, असा मैत्रीपूर्ण टोला शरद पवार यांनी मारला, तर ‘चांगले चारित्र्य आणि योग्य नियोजन हेच आपल्या कमाईचे गुपित आहे,’ असे सांगत मनोहर जोशी यांनी तो परतवून लावला. पैसा असेल तर आयुष्यातील ८० टक्के समस्या संपतात, असेही ते म्हणाले.

या समारंभाच्या निमित्ताने जोशी आणि शरद पवार यांच्यातील स्नेहाचे काही हळवे पदरही हलकेच उलगडले गेले. पहिल्यांदा मुंबईत आल्यावर लोकल प्रवास करताना मनोहर जोशी रेल्वेमार्गालगत उभ्या राहणाऱ्या इमारती न्याहाळत असत. तेथेच त्यांच्यातील बांधकाम व्यावसायिकाची मुळे रुजली आणि ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक झाले, असे सांगून पवार यांनी जोशी यांच्यासोबतच्या मैत्रीचे वयदेखील हळूच सांगून टाकले..

‘अवघे पाऊणशे वयोमान’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ असल्याने, साहजिकच, निवृत्ती आणि निवृत्तीनंतरचे जगणे या मुद्दय़ांभोवतीच सोहळ्याची क्षणचित्रे गुंफली गेली होती. पण निवृत्तीच्या समाधानी अनुभवांचा एक आगळा पटदेखील या निमित्ताने उपस्थितांसमोर खुला झाला. वयाची पाऊणशे वर्षे पार झाली की वाढत्या वयातील समस्या भेडसावू लागतात. नकारात्मक विचार मनावर आक्रमण करू लागतात. पण अशा विचारांवर मात करून सकारात्मक व आनंदी वृत्तीने वाढत्या वयास सामोरे गेले की या समस्याही हलक्या होतात, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिला. तरुण वयातच वृद्धापकाळाची शिदोरी साठवून ठेवली तर उतारवयातील समस्यांचा फारसा त्रास जाणवत नाही, असे त्या म्हणाल्या, तर शरद पवार यांनी आपल्या भाषणात मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे नेमके परीक्षणच श्रोत्यांसमोर केले. पाऊणशे वयमान झाले म्हणून आढय़ाकडे बघत वेळ घालविण्याची वृत्ती न बाळगता काही तरी करा, असा सल्ला या पुस्तकातून मनोहर जोशी यांनी दिला असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याचा आदर्शच या पुस्तकातून जोशी यांनी लोकांसमोर ठेवला आहे, असे पवार म्हणाले.

‘माणूस किती वर्षे जगला, यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे’ या लोकमान्य टिळकांच्या विचाराचा दाखला देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या निवृत्तीवर केलेल्या एका हळव्या टिप्पणीमुळे श्रोत्यांसह सारेच काही क्षण हळवे झाले. निवृत्ती आणि वयोमान या मुद्दय़ांवरच भाष्य करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सर्वाच्या मताशी सहमती व्यक्त केली. ‘निवृत्ती ही एक वृत्ती आहे’, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर यांचे दाखले देत उद्धव ठाकरे म्हणाले की या महान व्यक्ती कधी निवृत्त झाल्याच नाहीत. कारण त्यांचे विचार आजही जगण्याची शिकवण देतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला जगण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांच्यासारखे नेते कधीच निवृत्त होऊ  शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या कर्तृत्वाने यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या व्यक्ती मनोहर जोशी यांच्या पुस्तकात भेटतात, त्यामुळे हे पुस्तक दिशादर्शक आहे, असेही ते म्हणाले. देशातील वृद्धांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा या सोहळ्यात प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली.